...अन्यथा पाकमध्ये घुसून दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करू- अमेरिका
By admin | Published: October 23, 2016 11:37 AM2016-10-23T11:37:04+5:302016-10-23T11:44:49+5:30
दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 23 - दहशतवाद्यांना वारंवार अभय देण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर अमेरिकेनं सडकून टीका केली आहे. अमेरिकेनं पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दहशतवाद्यांना मदत करण्याचं बंद करा, अन्यथा पाकिस्तानात घुसून दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करू, असा इशारा दिला आहे.
शनिवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे टेररिझम आणि फायनान्शियल इंटेलिजिएन्सचे अॅक्टिंग अंडर सेक्रेटरी अॅडम जुबिन पाकिस्तानला इशारा देत म्हणाले, पाकिस्तान सरकारची आयएसआय ही गुप्तचर यंत्रणा कोणत्याही प्रकारची कारवाई पाकमधील सक्रिय दहशतवादी संघटनांविरोधात करु इच्छित नाही. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेनं पाकिस्तानला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मात्र पाकमधील आयएसआय ही संघटना दहशतवाद्यांवर कारवाई करत नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास पाकिस्तानमधील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका मागेपुढे पाहणार नाही.
अॅडम जुबिन म्हणाले, पाकिस्तानमधील शाळा, बाजार आणि मशिदी या दहशतवाद्यांमुळे त्रस्त आहेत. दुर्दैवाने आजही तिथे हल्ले होतात. अशा हिंसक हल्ल्यांमुळेच पाकिस्तानला वारंवार मागे राहावं लागत आहे. दरम्यान, अमेरिकेनेही इशारा दिला असला, तरी आतापर्यंत पाकिस्तानने कधीच मान्य केलं नाही की, पाकमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. उलट आम्ही दहशतवादविरोधी लढाईमध्ये सहभागी आहोत, असेच कायम पाकिस्तान म्हणत आला आहे. मात्र, भारतीय सीमेवर किंवा भारतातील दहशतवादी हल्ले करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.