आमची गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देते, पाकिस्तानी गुप्तचर अधिका-याचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 06:41 PM2017-09-26T18:41:43+5:302017-09-26T18:50:57+5:30
पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिका-यानं धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत 'त्या' अधिका-यानं इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंतीही त्यानं न्यायालयाला केली आहे.
इस्लामाबाद, दि. 26 - पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिका-यानं धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करत 'त्या' अधिका-यानं इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंतीही त्यानं न्यायालयाला केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचे सहाय्यक उपनिरीक्षक मलिक मुख्तार अहमद शहजाद यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. शहजाद यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (ISI)द्वारे करण्याची मागणीही न्यायालयाकडे केली आहे, असं वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र द डॉननं दिलं आहे.
सर्व प्रक्रियेची पडताळणी केल्यानंतर असं आढळलं आहे की, गुप्तचर यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी सरळ सरळ दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहेत, असंही याचिकेत म्हटलं आहे. तसेच मलिक मुख्तार अहमद शहजाद यानं या प्रकरणाची गुप्तचर यंत्रणेच्या महासंचालकांकडेही तक्रार केली होती. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच काही अधिकारी इस्रायलच्या दौ-यावर गेले असून, त्यांची अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेशीही हितसंबंध आहेत, असाही दावा या अधिका-यानं याचिकेत केला आहे. गुप्तचर यंत्रणांचे कझाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचंही याचिकेत म्हटलं असून, गुप्तचर यंत्रणेच्या संयुक्त संचालकांचा मुलगा या दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचाही खुलासा केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सईद अली शाह गिलानी यांचे सहकारी देविंदरसिंग बेहल यांनीही भारताची गुपिते पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला दिल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतीय लष्कराच्या हालचालींसह राष्ट्रीय गुपिते आयएसआयला दिली असावीत, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) म्हटलं होते.
दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आरोपावरून गिलानी यांच्या ठिकाणांवर एनआयएने 30 जुलै रोजी छापे घातले होते. बेहल राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणारी विशिष्ट माहिती आयएसआयला पाठवत होते, असा संशय आहे. त्यांच्यावर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा भारतीय दंड विधानाचे कलम 121 अंतर्गत दाखल करता येईल, असे एनआयएच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. ते जम्मू आणि काश्मीर सोशल पीस फोरमचे प्रमुख व हुर्रियतचे सदस्य आहेत. बेहल अतिशय जोरदारपणे ‘आझादी’च्या घोषणा देताना व ठार मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका, असे एका अंत्ययात्रेत आग्रहाने त्यानं सांगितलं होतं.