आमचे अण्वस्त्र भारतासाठीच, काश्मिरींना आत्मनिर्णयाचा अधिकार हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:41 AM2017-09-22T04:41:32+5:302017-09-22T07:19:37+5:30
भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्रांचा मुकाबला करण्यासाठीच पाकिस्तानने लघू श्रेणीतील आण्विक शस्त्रे विकसित केली आाहेत, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी व्यक्त केले आहे.
न्यू यॉर्क : भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्रांचा मुकाबला करण्यासाठीच पाकिस्तानने लघु श्रेणीतील आण्विक शस्त्रे विकसित केली आाहेत, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच अमेरिका दौ-यावर आले असून, पाकिस्तानची आण्विक अस्त्रे सुरक्षित होती आणि आहेत, असा दावा त्यांनी केला.
अब्बासी म्हणाले की, पाकिस्तानसोबतचा संभाव्य संघर्ष पाहता भारताकडून शस्त्रास्त्रे विकसित करण्यात आली आहेत. तथापि, आण्विक शस्त्रांच्या सुरक्षेसाठी आमच्याकडे कमांड अॅण्ड कंट्रोल सिस्टीम आहे. त्यामुळे अतिरेकी वा कोणतीही शक्ती त्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे घोषणापत्र लागू करावे अशी मागणी करताना जम्मू व काश्मिरातील जनतेला आत्मनिर्णयाचा अधिकार हवा, असा आपला आग्रह आहे, असे सांगून अब्बासी म्हणाले की, घोषणापत्र लागू झाल्यास वादग्रस्त मुद्दे सोडविण्यास मदत होईल.
>सिंधू पाणीवाटप करार शक्य
सिंधू पाणीवाटप कराराबाबत भारत व पाकिस्तानमध्ये असलेले मतभेद सोडविण्याची तरतूद करारातच आहे, असे शाहीद अब्बासी यांनी सांगितले. दोन्ही देशांनी प्रयत्न केल्यास जागतिक बँकही याचे कौतुक करेल, असे ते म्हणाले.