आमची सुरक्षा अभेद्य, पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची भारताला धमकी
By admin | Published: September 7, 2016 01:22 PM2016-09-07T13:22:09+5:302016-09-07T13:24:02+5:30
पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आपल्यासमोर कोणाचाही टिकाव लागू शकत नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भारताला धमकी दिली आहे
Next
- ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 7 - पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आपला देश पहिल्यापासून भक्कम होता आणि आता त्याची ताकद इतकी वाढली आहे की कोणाचाही आमच्यासमोर टिकाव लागू शकत नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे भारताला धमकीवजा इशारा दिला आहे. 'आपल्या लोकांचं बलिदान वाया जाणार नाही. आमच्या देशाच्या शत्रुंना मी सांगू इच्छितो की आता पाकिस्तानला हरवणं कठीण आहे,' असंही राहिल शरीफ बोलले आहेत.
पाकिस्तानच्या डिफेन्स डे निमित्त आयोजित कार्यक्रमात राहिल शरीफ बोलत होते. यावेळी राहिल शरीफ यांनी पाकिस्तानच्या हक्कांसाठी लढताना जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. 'अफगाणिस्तानमध्ये शांतता स्थापन करण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत असल्याचंही', राहिल शरीफ बोलले आहेत.
शरीफ यांनी काश्मीरच्या मुद्यावर मत मांडताना 'काश्मीर म्हणजे पाकिस्ताची रक्तवाहिनी आहे, खो-यातील लोकांना राजकीय आणि नैतिक स्तरावर नेहमीच पाठिंबा देणार', असं सांगितलं आहे. 'दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी कायदा मजबूत करण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या शत्रुंना मला स्पष्ट सांगायचं आहे की पाकिस्तान पहिल्यापेक्षा जास्त ताकदवान आणि अभेद्य झाला आहे', असा धमकीवजा इशारा राहिल शरीफ यांनी यावेळी दिला.
राहिल शरीफ यांनी पाकिस्तान आणि चीनच्या मैत्रीचं उदाहरण देत एकमेकांबदल आदर आणि समानता तत्वांवर मैत्री आधारित असल्याचं सांगितलं. 'चीन आणि पाकिस्तानदरम्यान उभं राहत असलेलं इकॉनॉमिक कॅरिडोअर या मैत्रीचं उत्तम उदाहरण आहे', असंही ते बोललेत. यावेळी राहिल शरीफ यांनी भारताचं नाव न घेता 'सीमारेषेवरील धोक्यांची कल्पना आम्हाला आहे. मैत्रीसोबत शत्रुत्व निभावणंही आम्हाला चांगलंच जमतं', अशी धमकी दिली आहे.