ओव्हर केलं राव....4 चेंडूत दिल्या 92 धावा
By admin | Published: April 12, 2017 12:12 PM2017-04-12T12:12:55+5:302017-04-12T12:12:55+5:30
क्रिकेटच्या एवढ्या मोठ्या इतिहासात एखाद्या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 92 धावा दिल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का ?
Next
>ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. 12 - क्रिकेट म्हटलं की रोज नवनवीन रेकॉर्ड होत असतात, ते रोज तोडलेही जात असतात. क्रिकेटमध्ये रोज नवा रेकॉर्ड होताना आपण पाहिलं असेल. पण क्रिकेटच्या एवढ्या मोठ्या इतिहासात एखाद्या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 92 धावा दिल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं आहे का ? नक्कीच नसणार. पण बांगलादेशमधील क्लब क्रिकेट खेळणा-या एका गोलंदाजाने फक्त चार चेंडूंमध्येच एवढ्या धावा दिल्या आहेत. बसला ना आश्चर्याचा धक्का. एखादा गोलंदाज इतके वाईड बॉल टाकत असताना कर्णधाराने त्याची बॉलिंग काढून का घेतली नाही ? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. पण मैदानावरील या इतिहासामागे एक कहाणी आहे.
ढाका सेकंड डिव्हिजन क्रिकेट लीगमध्ये मंगळवारी लालमटिया क्लब विरुद्ध एग्जोम क्रिकेटर्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. क्रिकेट कमिटी ऑफ ढाका मेट्रोपोलिस यांनी या लीगचं आयोजन केलं होतं. लालमटिया संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. 14 ओव्हर्समध्ये 88 धावा करत संपुर्ण संघ गारद झाला. यामध्ये एक रन आऊट, तीन विकेटकीपरकडे झेल, दोन पायचीत आणि एक स्टम्प आऊट झाला होता.
यानंतर लालमाटिया संघ मैदानात उतरला असता गोलंदाज सुजोन महमूद याने पहिली ओव्हर टाकण्यासाठी चेंडू हातात घेतला आणि फक्त चार चेंडूत 92 धावा देण्याचा पराक्रम केला. सुजोनने एकूण 65 वाईड आणि तीन नो बॉल टाकत विरोधी संघाला बॅटला चेंडू न लावण्याची संधी देत विजय मिळवून दिला. एग्जोम क्रिकेटर्स मैदानात उतरल्यानंतर सामोरी गेलेल्या पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी विजय मिळवला. अशाप्रकारे एकही चेंडू न खेळता आणि एकही विकेट न गमावता त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला.
गोलंदाजाची ही सुमार कामगिरी नसून त्याने जाणुनबुजून अशी गोलंदाजी केली. सुजोन महमूदने पंचांच्या वादग्रस्त निर्णयांना विरोध दर्शवण्यासाठी अशी गोलंदाजी केली. विशेष म्हणजे हा एकट्या सुजोन महमूदचा निर्णय नव्हता, तर संपुर्ण संघाने यासाठी त्याला पाठिंबा दिला होता.
लालमटिया क्लबचे महासचिव अदनान रहमान यांनी सांगितलं की, "लालमटिया संघा पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे संतापला होता. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य केलं". अदनान यांनी सांगितल्याप्रमाणे, "सामन्याच्या सुरुवातीपासूनच रडीचा डाव सुरु झाला होता. त्यांनी आमच्या कर्णधाराला टॉस पडल्यानंतर पहायलादेखील दिलं नाही. आमचे सर्व खेळाडू तरुण असून त्यांना हा रडीचा डाव पटला नाही. एकानंतर एक सर्व निर्णय आमच्याविरोधात होते. त्यामुळेच आम्ही त्यांना जिंकवून टाकलं".