पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 19:36 IST2025-04-23T19:33:26+5:302025-04-23T19:36:00+5:30

Pahalgam Terror Attack: जगभरातील देशांनी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

pahalgam attack bangladesh first reaction came after 24 hours know what muhammad yunus said | पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, यापैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत. जगभरातील देशांनी याबाबत भाष्य केले आहे. यातच आता बांगलादेशमधूनही पहलगाम हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. देशातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख आणि तीनही दलाचे प्रमुख तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत एक महत्वपूर्ण बैठक घेतली. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरला जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

आधी परराष्ट्र मंत्रालयाची पोस्ट, मग मोहम्मद युनूस यांची प्रतिक्रिया

काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांबद्दल माझ्या तीव्र शोकसंवेदना व्यक्त करतो. आम्ही या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवादाविरुद्ध बांगलादेशची भूमिका ठाम असल्याचे पुन्हा एकदा सांगतो, अशी एक पोस्ट एक्सवर मोहम्मद युनूस यांनी केली आहे. मोहम्मद युनूस यांनी ही पोस्ट करण्याच्या काहीच वेळ आधी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत एक्सवर पोस्ट केली. एक प्रसिद्धीपत्रक शेअर करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा बांगलादेश तीव्र निषेध करतो. यामध्ये निष्पाप लोकांचे बळी गेले, हे दुःखद आहे. बांगलादेश पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि सहानुभूती व्यक्त करतो, असे यात म्हटले आहे. 

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला भारताकडून हल्ल्या होण्याची भीती सतावत आहे. ही भीती रास्त आहे, कारण जेव्हा पुलवामा हल्ला झाला, तेव्हाही भारताने तात्काळ पाकवर हवाई हल्ला केला होता. त्यामुळेच आता पाकिस्तान घाबरलेल्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यानंतर आता एनएसए अजित डोभाल कामाला लागले आहेत.

 

Web Title: pahalgam attack bangladesh first reaction came after 24 hours know what muhammad yunus said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.