कॅनडामध्ये तीन भारतीय विद्यार्थ्यांचा भीषण मृत्यू; सख्ख्या बहीण भावाचा जागीच गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 08:56 AM2024-07-30T08:56:32+5:302024-07-30T08:58:02+5:30
कॅनडामध्ये पुन्हा एकदा तीन भारतीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला
Indian Students Killed : गेल्या काही वर्षांपासून परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच कॅनडामध्ये झालेल्या एका भीषण अपघातातपंजाबमधील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. यामध्ये दोन सख्ख्या भाऊ आणि बहिणींचाही समावेश आहे. दरम्यान गेल्या पाच वर्षांत परदेशात ६३३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली. दुसरीकडे कॅनडातल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूने कुटुंबियांना धक्का बसला आहे.
कॅनडातील न्यू ब्रन्सविक प्रांतातील मिल कोव्ह परिसरात ते प्रवास करत असलेल्या कारला अपघात होऊन तीन भारतीय विद्यार्थी ठार झाले तर अन्य एक जण जखमी झाला. तिघेही मृत पंजाबचे रहिवासी होते. २३ वर्षीय हरमन सोमल आणि १९ वर्षीय नवज्योत सोमल अशी मृतांची नावे आहेत, ते लुधियानामधील मलौद गावातील दोन भावंडं आहेत. हरमन हा मॉन्कटनमध्ये डे-केअरमध्ये काम करत होता, तर नवज्योत सोमल काही महिन्यांपूर्वी स्टडी व्हिसावर कॅनडाला गेली होता. रसमदीप कौर असे तिसऱ्या मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती पंजाबमधील संगरूर जिल्ह्यातील सामना येथील रहिवासी होती. रसमदीप ही भूपिंदर सिंग आणि सुचेत कौर यांची मुलगी होती. ते सरकारी शिक्षक आहेत.
टॅक्सीचा टायर फुटल्याने त्यांच्या कारचे नियंत्रण सुटून अपघात झाला. कारमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त तीन जण होते. अपघातानंतर तिन्ही विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उडी मारली ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण पीआरसाठी अर्ज करून परतत असताना ही दुर्घटना घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांकडून अपघाताचे कारण अद्याप तपासाले जात आहे. प्राथमिक अहवालानुसार निसरडा रस्ता आणि खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, असं म्हटलं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी रात्री ९.३०च्या दरम्यान कॅनडातील हायवे क्रमांक दोनवर हा अपघात झाला. टायर फुटल्याने हा अपघात झाला असून यामध्ये कार चालकाला गंभीर दुखापत झाली. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन विद्यार्थी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघाताच्या कारणाबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्कारासाठी त्यांचे मृतदेह परत आणावेत असे आवाहन केले आहे.
दुसरीकडे लोकसभेत गेल्या आठवड्यात परदेशातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. परदेशात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक कारणांसह विविध कारणांमुळे ६३३ भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये १७२ प्रकरणे कॅनडातील आहेत. १९ भारतीय विद्यार्थ्यांचां हल्ल्यात मृत्यू झाला आहे, त्यापैकी सर्वाधिक नऊ मृत्यू कॅनडामध्ये आणि सहा अमेरिकेत झाले आहेत. ६३३ मृत्यूंपैकी १०८ अमेरिकेमध्ये, ५८ यूकेमध्ये, ५७ ऑस्ट्रेलियामध्ये आणि ३७ रशियामध्ये नोंदवले गेले.