हाफिज सईदच्या घराबाहेरील स्फोटामागे RAW चा हात; पाकच्या उलट्या बोंबा, इम्रान खान म्हणाले पुरावेच दाखवतो!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 10:56 AM2021-07-05T10:56:39+5:302021-07-05T10:59:06+5:30
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील राहत्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचा (RAW) हात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे.
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील राहत्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचा (RAW) हात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. गेल्या महिन्यात हाफिज सईदच्या राहत्या घराबाहेर एका कारमध्ये शक्तीशाली स्फोट झाला होता. यात ३ जणांचा मृत्यू तर २४ जण जखमी झाले होते. (Pak blames RAW for blast outside Hafiz home, Imran lauds ‘proof’ hunt)
"जम्मू-काश्मीरमध्ये संशयास्पदरित्या ड्रोन घिरट्या घालत असून हल्ले सुरू असल्याचा कांगावा भारताकडून केला जात आहे. भारताचं हे सगळं नाटक असून लाहोर येथील बॉम्बस्फोटावरुन लक्ष विचलीत करण्यासाठीचा केवलवाणा प्रयत्न सुरू आहे", असा दावा पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. मोईद युसूफ यांनी केला आहे.
"लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी आमच्याकडे पुरावे आणि माहिती आहे. यात आर्थिक आणि टेलिफोनिक संभाषण अशी सर्व माहिती आम्ही मिळवली आहे. बॉम्बस्फोट घडवलेल्या दहशतवाद्यांना भारतातून आर्थिक मदत झाल्याचं हाती आलेल्या पुराव्यांमधून स्पष्ट होत आहे", असं डॉ. मोईद युसूफ माहिती तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी आणि पंबाज पोलीस प्रमुख इनाम घानी यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुप्तचर यंत्रणांनी लाहोर येथील बॉम्बस्फोटाबाबत गोळा केलेल्या पुराव्यांचं कौतुक केलं. "पंजाब पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाच्या मेहनतीची आणि गतीची मी प्रशंसा करतो. आमच्या सर्व नागरी आणि लष्करी गुप्तचर संस्थांच्या उत्कृष्ट समन्वयाचं कौतुक करायला हवं", असं ट्विट इम्रान खान यांनी केलं आहे.
२३ जून रोजी स्फोटकांनी भरलेल्या कारचा लाहोर येथे दहशतवादी आणि जमात उद दवा संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याच्या घराबाहेर स्फोट झाला होता. या हल्ल्यामागचा मास्टरमाईंडला शोधण्यात यश आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. ज्या दहशतवाद्यांनी स्फोटकं ठेवली होती त्यांच्याकडून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि महत्वाची माहिती हाती लागल्याचा दावा पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार युसून यांनी केला आहे.
"कराचीमधील स्फोटामागे भारतीय व्यक्तीचा हात असून यात 'रॉ'चा सहभाग आहे यात कोणतंच दुमत नाही. यासंबंधची सबळ पुरावे हाती लागले आहेत", असं युसूफ यांनी म्हटलं आहे.