पाककडून १७२ भारतीय मच्छीमारांची सुटका
By admin | Published: February 15, 2015 11:53 PM2015-02-15T23:53:31+5:302015-02-15T23:53:31+5:30
पाकिस्तानने रविवारी १७२ भारतीय मच्छीमारांची सुटका केली असून, भारताबद्दल सदिच्छा म्हणून मच्छीमारांची सुटका केल्याचे म्हटले आहे.
कराची : पाकिस्तानने रविवारी १७२ भारतीय मच्छीमारांची सुटका केली असून, भारताबद्दल सदिच्छा म्हणून मच्छीमारांची सुटका केल्याचे म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वचषक किकेट स्पर्धा सुरू होण्याआधी पाक व इतर सार्क राष्ट्रप्रमुखांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या, तसेच उच्चस्तरीय संपर्क पुन्हा सुरू करण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर मच्छीमारांची सुटका केली आहे. आम्ही या मच्छीमारांना आज सोडले असून, त्यांना वाघा सीमेपर्यंत रेल्वेने पोहोचवले जाईल, असे मलीर तुरुंगाचे अधीक्षक मुहम्मद सेहतो यांनी सांगितले. मलीर व लांधी तुरुंगातील मच्छीमार कैद्यांची मुक्तता करण्यात आली.
भारत व पाकमधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दिवशीच या कैद्यांची सुटका होणे हा योगायोग आहे. या मच्छीमारांपैकी बहुतांश जणांनी आपली शिक्षा पूर्ण केलेली आहे, असे सेहतो यांनी सांगितले. मोदी यांनी नवाज शरीफ यांना फोन केला तेव्हा परराष्ट्र सचिव जयशंकर यांना सार्क राष्ट्रात पाठविणार असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)