नवाझ शरीफ यांचा पाकमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा, निवडणूकही लढवता येणार; विधेयक मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 09:34 AM2023-06-26T09:34:26+5:302023-06-26T09:47:16+5:30
पाकिस्तानी असेंब्लीत नवाझ शरीफ यांना डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने खासदारांच्या अपात्रतेची मर्यादा आजीवन ऐवजी 5 वर्षांपर्यंत मर्यादित ठेवणारे विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे आता नवाझ शरीफ लंडनहून पाकिस्तानात परतले तर त्यांनाही निवडणूक लढवता येणार आहे. दरम्यान, पाकिस्तानी असेंब्लीत नवाझ शरीफ यांना डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत नवाझ शरीफ पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात येऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. नवाझ शरीफ यांच्यावर जे काही निर्बंध लादण्यात आले होते. ते मंजूर करण्यात आलेल्या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर राहणार नाहीत. नवाझ शरीफ आता लंडनहून पाकिस्तानात परत येऊ शकतील आणि त्यांना सार्वजनिक पदावर राहण्याची संधीही मिळू शकते.
2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवले होते. 2018 मध्ये 'पनामा पेपर्स' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांना आजीवन सार्वजनिक पदावर राहण्यास अपात्र ठरवले. निवडणूक (सुधारणा) विधेयक, 2023 चा उद्देश खासदारांच्या अपात्रतेची वेळ मर्यादा कमी करणे, तसेच पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला (ECP) राष्ट्रपतींशी सल्लामसलत न करता निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार देणे हे आहे.
दरम्यान, हे विधेयक 16 जून रोजी सिनेटने आधीच मंजूर केले होते. कायदा होण्यासाठी या विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता घ्यावी लागेल. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थित राष्ट्रपती आरिफ अल्वी हजसाठी देशाबाहेर गेले आहेत. त्यामुळे सिनेटचे अध्यक्ष सादिक संजरानी काळजीवाहू अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यामुळे वेळ वाया न घालवता हे विधेयकाला मंजुरी देतील, असे म्हटले जात आहे.