पाक म्हणतो, मसूद अझहर बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 04:00 AM2020-02-18T04:00:28+5:302020-02-18T04:01:50+5:30
‘एफएटीएफ’ला दिली माहिती : कुटुंबियांचाही ठावठिकाणा नाही
नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी मसूद अझहर हा पाकिस्तानातून गायब झाला आहे, तसेच त्याच्या कुटुंबियांचीही काही माहिती नाही, असे पाकिस्तानने फायनान्सियल अॅक्शन टास्क फोर्सला (एफएटीएफ) सांगितले आहे.
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी १ मे २०१९ रोजी दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. पाकिस्तान आधीपासूनच ग्रे लिस्टमध्ये आहे. त्यांच्यावर ब्लॅक लिस्ट होण्याची टांगती तलवार आहे. सध्या त्यांचे प्रकरण एफएटीएफकडे विचारासाठी गेलेले आहे. दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पाकिस्तानने पर्याप्त पावले उचलली आहेत की नाही, याची पाहणी केली जात आहे.
दरम्यान, आॅक्टोबरमध्ये जी बैठक झाली होती त्यात पाकिस्तानने असा दावा केला होता की, मसूद आणि त्याचा परिवार बेपत्ता आहे. भारतातील अनेक अतिरेकी घटनांमागे मसूद अझहरचा हात आहे. गतवर्षी पुलवामात १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारीही जैशने स्वीकारली होती.
पाकिस्तानने असा दावा केला आहे की, संयुक्त राष्ट्रांकडून अतिरेकी म्हणून घोषित करण्यात आलेले एकूण १६ जण पाकच्या भूमीवर होते. त्यातील ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. उर्वरित ९ जणांनी संयुक्त राष्ट्रांकडे अशी मागणी केली आहे की, त्यांच्यावर लावण्यात आलेले अर्थ व प्रवास निर्बंध हटविण्यात यावेत. यात लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद, हाजी मुहम्मद अशरफ, जफर इकबाल, हाफीज अब्दुल सलाम भुट्टवी, याहया मोहम्मद मुजाहीद, आरिफ कासमानी आणि अल कायदाला अर्थपुरवठा करणारा अब्दुल रहमान यांचा समावेश आहे. सध्या या व्यक्तींचे बँक खातेही बंद करण्यात आले आहेत.