निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 03:45 PM2023-12-22T15:45:56+5:302023-12-22T15:56:44+5:30

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात अटक केल्यानंतर जामीन अर्ज मंजूर केला.

Pak Supreme Court grants Imran Khan, Shah Mahmood Qureshi Bail in Cypher Case | निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

निवडणुकीपूर्वी इम्रान खान यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे माजी अध्यक्ष इम्रान खान यांना सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मोठा दिलासा मिळाला आहे. इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे उपाध्यक्ष शाह मेहमूद कुरेशी यांना सायफर प्रकरणात अटक केल्यानंतर जामीन अर्ज मंजूर केला.

दरम्यान, तोशाखाना प्रकरणात दोषी ठरल्यानंतर इम्रान खान ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. इम्रान खान यांना 8 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या  पाकिस्तान संसदीय निवडणुकीपूर्वी जामीन मिळाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान खान यांचा तुरुंगातील खटला रद्दबातल ठरवल्यानंतर अधिकृत गुपिते कायदा 2023 अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष कोर्टाद्वारे या महिन्याच्या सुरुवातीला सायफर प्रकरणात त्यांना पुन्हा दोषी ठरवले होते.

इम्रान खान यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हुमायून दिलावर यांनी तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून तीन वर्षांचा तुरुंगवास आणि 100,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खान हे पंतप्रधान म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून 140 दशलक्ष (USD 490,000) पेक्षा जास्त किमतीच्या सरकारी भेटवस्तू विकल्याबद्दल दोषी आढळले होते. 

या भेटवस्तू इम्रान खान यांना त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान परदेशी मान्यवरांकडून मिळाल्या होत्या.  गेल्या वर्षी एप्रिल 2022 मध्ये इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले होते. यानंतर  9 मे 2023 रोजी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (NAB)  भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती.
 

Web Title: Pak Supreme Court grants Imran Khan, Shah Mahmood Qureshi Bail in Cypher Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.