पाक तालिबानच्या प्रमुखाचा खात्मा?
By admin | Published: March 24, 2015 02:17 AM2015-03-24T02:17:51+5:302015-03-24T02:17:51+5:30
दहशतवादी संघटना तेहरिक-ए-तालिबानचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला एका भीषण हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे.
इस्लामाबाद : दहशतवादी संघटना तेहरिक-ए-तालिबानचा प्रमुख मुल्ला फजलुल्ला एका भीषण हवाई हल्ल्यात मारला गेल्याचे वृत्त आहे. गेल्या आठवड्यात खैबर पख्तुनख्वा प्रांतात पाकिस्तानने सुरू केलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेंतर्गत करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात तो ठार झाला.
फजलुल्ला (४०) हा पेशावर येथील लष्करी शाळेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आहे. २०१३ मध्ये हकिमुल्ला मेहसूद मारला गेल्यानंतर फजलुल्ला याच्याकडे पाक तालिबानची सूत्रे आली होती. हवाई हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याचे सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
सैन्य दलाने सांगितले की, कमीत कमी ८० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर १०० हून अधिक जखमी झाले. गेल्या आठवड्यात खैबर प्रांतात दहशतवादविरोधी मोहीम राबविण्यात आली. सैन्य दलाच्या कारवाईत फजलुल्ला दगावला गेल्याची शक्यता सैन्य दलाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सात सैनिक मृत्युमुखी पडले.
खैबर पख्तुनख्वा प्रांताचे गव्हर्नर मेहताब खान अब्बासी यांनी सोमवारी सांगितले की, येत्या दिवसांत फजलुल्लाच्या मृत्यूस दुजोरा मिळेल. तथापि, तालिबानच्या प्रवक्त्याने आपला म्होरक्या मारला गेल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. निधनाचे वृत्त निराधार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता मोहंमद खोरासानी म्हणाले.
(वृत्तसंस्था)
४फजलुल्ला हा ‘रेडिओ मुल्ला’ या टोपण नावाने ओळखला जातो. गेल्या १६ डिसेंबर रोजी पेशावर येथील लष्करी शाळेवरील हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधार आहे. या हल्ल्यात १५४ जण मृत्युमुखी पडले होते.
४पेशावर हल्ल्यानंतर पाक सैन्य दलाच्या प्रमुखांनी अफगाणिस्तानला भेट देऊन दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम उघडली होती. अफगाणिस्तान सरकार दीर्घकाळापासून तेहरीक-ए- तालिबानच्या कारवायांना लगाम घालण्याचे आवाहन पाकला करत होते.