अयोध्येत मोदींचं 'जय श्रीराम' अन् पाकिस्ताननं आळवला वेगळाच राग; इम्रान खान म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 07:03 PM2020-08-05T19:03:54+5:302020-08-05T19:04:43+5:30
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण; पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा तीळपापड
इस्लामाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन केलं. त्यामुळे आता भव्य दिव्य राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी याच दिवशी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला जोरदार धक्का बसला. या घटनेच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला पाकिस्ताननं नवा नकाशा प्रसिद्ध करत काश्मीरमधील वादग्रस्त भागावर दावा सांगितला. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कलम ३७० वर पुन्हा भाष्य केलं आहे.
भारतानं गेल्या वर्षी उचलेलं पाऊल एक मोठी चूक होती आणि आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फसले आहेत, असं खान यांनी म्हटलं आहे. 'काश्मीरला भारतापासून लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल. पंतप्रधान मोदींनी गेल्या ५ ऑगस्टला एक मोठी चूक केली. मोदींना आधी कलम ३७० हटवण्याची भीती वाटत होती. मात्र निवडणूक समोर असल्यानं हिंदूना खूष करण्यासाठी त्यांनी इतका मोठा चुकीचा निर्णय घेतला,' असं खान म्हणाले आहेत.
काश्मीरमध्ये संघाच्या ठगांना दहशतवादासाठी सोडू आणि मग काश्मीर हार मानेल, असं पंतप्रधान मोदींना वाटलं होतं, असा आरोप खान यांनी केला. 'पाकिस्तान मैत्री करू पाहतोय, म्हणून तो गप्प बसले, असं मोदींना वाटलं. आमचं सरकार येण्याआधी काश्मीरमध्ये पॅलेट गन्सचा वापर केला जात होता, त्यावेळी कोणीच तिथल्या नागरिकांशी संवाद साधत नव्हतं. पाकिस्तानही नाही आणि संयुक्त राष्ट्रदेखील नाही. त्यामुळेच मोदींनी अहंकाराच्या भावनेतून ५ ऑगस्टला कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण जग आपल्या बाजूनं उभं राहील, असं मोदींना वाटलं. कारण पाश्चिमात्य देशांना चीनविरोधात भारताचा वापर करून घ्यायचा आहे,' असं खान म्हणाले.