दहशतवादी हाफिज सईदला ३२ वर्ष कारावासाची शिक्षा; पाकिस्तान न्यायालयाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 07:27 AM2022-04-09T07:27:07+5:302022-04-09T07:27:33+5:30
दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याच्या काही प्रकरणांमध्ये पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफिज सईद याला चार वेगवेगळ्या कालावधीच्या तुरुंगवासाच्या शिक्षा तेथील न्यायालयाने शुक्रवारी सुनावल्या.
इस्लामाबाद : दहशतवाद्यांना पैसा पुरविल्याच्या काही प्रकरणांमध्ये पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफिज सईद याला चार वेगवेगळ्या कालावधीच्या तुरुंगवासाच्या शिक्षा तेथील न्यायालयाने शुक्रवारी सुनावल्या. हाफिज सईद हा मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आहे.
या चार तुरुंगवासाच्या शिक्षा सहा महिन्यांपासून ते पाच वर्षांपर्यंतच्या कालावधीच्या आहेत. हाफिज सईद (वय ७० वर्षे) याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दिला आहे. याआधी अशा प्रकारच्या पाच प्रकरणांमध्ये हाफिज सईदला ३६ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला ३ लाख ४० हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.
लाहोर येथील कोट लखपत कारागृहामध्ये २०१९पासून हाफिज सईद बंदी असून त्याला शुक्रवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत दहशतवादविरोधी न्यायालयात आणण्यात आले. हाफिज याला अमेरिकेने ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने डिसेंबर २००८मध्ये हाफिज सईदला ‘दहशतवादी’ घोषित केले होते.
भारताच्या मागणीकडे पाकने केला होता कानाडोळा
मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी हाफिज सईद व त्या कटात सहभागी झालेल्या अन्य लोकांवरील खटल्यांचा लवकरात लवकर निकाल लावून त्यांना कडक शिक्षा सुनावण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. मात्र, पाकिस्तानने त्याकडे कानाडोळा केला होता.