Afghanistan मध्ये तालिबान उभं करण्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात; अमेरिकान खासदाराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:40 AM2021-08-23T10:40:48+5:302021-08-23T10:43:26+5:30
Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानवर तालिबाननं मिळवलेल्या ताब्यामुळे संपूर्ण जग आहे चिंतेत. तालिबानला पुन्हा उभं करण्यात पाकिस्तानचा हात असल्याचा अमेरिकन खासदाराचा दावा.
अफगाणिस्तानवरतालिबाननं मिळवलेल्या ताब्यामुळ संपूर्ण जग चिंतेत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान आणि चीन हे असे देश आहेत ज्यांच्याकडून तालिबानला समर्थन देण्यात येत आहे. तालिबानच्या निर्मितीमागे पाकिस्तानचा हात आहे, ते कोणापासून लपलेलं नाही. पण तरीही पाकिस्तान हे नाकारत आलं आहे. मात्र, आता एका अमेरिकन खासदारानं तालिबानवरून पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या कब्जामागे पाकिस्तान आणि त्याच्या गुप्तचर यंत्रणेची महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाच्या खासदाराक़डून करण्यात आला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टीव शॅबॉट हे हिंदू पॉलिटीकल अॅक्शन कमिटीच्या एका व्हर्च्युअल बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांना शरण देण्याच्या भारताच्या निर्णयाचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला. "आपण सर्व जाणतोच, विशेष करून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेनं अफगाणिस्तानात तालिबानला पुन्हा उभं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अफगाणिस्तावर तालिबाननं मिळवलेल्या ताब्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी विजय साजरा करणं हे अतिशय वाईट आहे," असंही शॅबॉट म्हणाले.
पाकिस्तान जबाबदार
"अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानं अल्पसंख्यांकांवर अत्याचार होतील आणि जबाबदार पाकिस्तान आहे. अपहरण, धर्मांतरण आणि अल्पवयीन मुलींचं जबरदस्ती जास्त वयाच्या लोकांशी लग्न करून देण्यासारखे प्रकार अल्पसंख्यांकांच्या बाबत होऊ शकतात. पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू समाजावर छळ होत आहे. पाकिस्तानात हिंदू मुलींचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करणे. तसेच अल्पवयीन हिंदू मुलींचं वृद्ध मुस्लिम पुरुषाशी लग्न लावणे, असे अत्याचार सुरु आहेत" असंही त्यांनी नमूद केलं. काही दिवसांपासून अफगाणिस्तानातील माध्यमांमध्ये हिंदूंवरील अत्याचाराचं वृत्त समोर येत आहे. अमेरिकेतही ६० लाख हिंदू वास्तव्यास आहेत आणि देशाचा अभिन्न हिस्सा आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं