पाकने हवाई क्षेत्रातील बंदी हटवली; भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 07:43 AM2019-07-16T07:43:37+5:302019-07-16T07:46:12+5:30
पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं.
नवी दिल्ली - मागील काही महिने पाकिस्तान हवाई क्षेत्रात असणारी बंदी मंगळवारी सकाळी पाकिस्तान सरकारने उठविली आहे. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविल्यामुळे भारतीय विमानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करु शकणार आहेत.
पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे विशेषत: एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे कारण पाकिस्तानने घातलेल्या हवाई क्षेत्रातील बंदीमुळे एअर इंडियाचे जवळपास 491 कोटी रुपयांचे नुकसान झालं होतं. अनेक आंतरराष्ट्रीय विमानाचे मार्ग बदलण्यात आले होते. मंगळवारी पहाटे 12.41 मिनिटांनी पाकिस्तानने हवाई क्षेत्रातील बंदी उठविली. त्यामुळे या मार्गातून पुन्हा सामान्यरित्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्रालयाकडून याबाबत एअरमेन(NOTAM) नोटीस जारी केली आहे.
Pakistan Civil Aviation Authority issues notice to airmen (NOTAM), states "with immediate effect Pakistan airspace is open for all type of civil traffic on published ATS (air traffic service) routes". pic.twitter.com/UMuOnK3WSg
— ANI (@ANI) July 16, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट भागात घुसून एअर स्ट्राईक केला होता. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांना भारताने टार्गेट केलं होतं. त्यामुळे पाकिस्तानकडून भारतीय विमान उड्डाणांना त्यांच्या हवाई हद्दीत प्रवेश बंद केला होता. पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक भारतीय विमान कंपन्यांना त्याचा फटका बसला होता. एअर इंडिया आणि अन्य विमान कंपन्यांना मिळून 548 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
पुलवामा हल्ल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी भारताने पाकिस्ताच्या बालकोट भागावर एअर स्ट्राईक केला होता. तेव्हापासून पाकिस्तानने त्यांच्या हवाई क्षेत्राच्या हद्दीतील उड्डाण बंद केली होती. जवळपास 3 महिने झाले तरी पाकिस्तानने अद्याप त्यांच्या हवाई क्षेत्रातील फक्त 2 मार्ग खुले केले होते. हे दोन्हीही मार्ग दक्षिण पाकिस्तानहून जातात. पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र 11 भागात विभागले आहे. मात्र मंगळवारी पाकिस्तानकडून सर्व हवाई मार्ग खुले करण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे संघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन(SCO) च्या शिखर संमेलनाला उपस्थित राहिले होते. त्यावेळी बिश्केक येथे जाण्यासाठी पंतप्रधान पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार होते. मात्र ऐनवेळी भारताने आशियाई हवाई मार्गातून बिश्केकचा प्रवास केला.