Pakistan SH 15 Howitzer: भारताची मिसाईल पडताच पाक बिथरला; अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या चिनी तोफा मागविल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 03:40 PM2022-03-15T15:40:37+5:302022-03-15T15:42:51+5:30
भारताच्या K-9 वज्र तोफेचा मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने चीनमध्ये तयार केलेल्या SH-15 तोफांचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.
भारताच्या वज्र तोफेने बिथरलेल्या पाकिस्तानी लष्कराने चीनमध्ये तयार केलेल्या 155 मिमी SH-15 स्वयंचलित तोफेचा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे. ही तोफ अधिक अंतरापर्यंत मारा करू शकते आणि यामुळे लष्कराला अधिक बळकटी मिळेल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दिली. पाकिस्तानने चीनला 52 तोफांची ऑर्डर दिल्याचं सांगण्यात येत आहे. चीनची ही अत्याधुनिक तोफ जवळपास 53 किमीपर्यंत मारा करू शकते. जर पाकिस्तान छोटा अणुबॉम्ब बनवण्यात यशस्वी झाला, तर या तोफेच्या मदतीने तो डागता येऊ शकेल असं मत संरक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञानी व्यक्त केलं.
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार S15 तोफ सहजपणे कुठेही नेली जाऊ शकते. 155 मिमी तोफ. ही तोफ घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या खिडक्या बुलेटप्रूफ आहेत. याची रेंज 53 किलोमीटर असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते याची रेंज 72 किमी इतकी आहे. 5 जणांची टीम हे ऑपरेट करू शकते. तसंच याचं एकूण वजन 22 टन इतकं आहे. स्वसंरक्षणासाठी या तोफेवर मशीनगनही बसवता येते. ही तोफ कुठेही तैनात केली जाऊ शकते, असा दावाही पाकिस्ताननं केला आहे.
Pakistan formally inducted much awaited SH-15 HOWITZER in Artillery Corps...
— Sumaira Khan (@sumrkhan1) March 15, 2022
COAS attended induction ceremony of the Guns...says #ispr... pic.twitter.com/URFvd7gFuV
चीनच्या सरकारी कंपनीनं केली तयार
लहान अणुबॉम्ब सहजरित्या डागू शकत असल्यानं SH-15 ही स्वयंचलित तोफ भारतासाठी धोकादायक आहे. पाकिस्तान लहान अणुबॉम्ब बनवण्याचा अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. पाकिस्ताननं लहान अणुबॉम्ब तयार केल्याचा दावा पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनीही केला आहे. ही तोफ चीनच्या सरकारी कंपनी नोरिंकोने बनवली आहे. एका मिनिटांत सहा बॉम्ब डागण्याची याची क्षमता असल्याचं चीनचं म्हणणं आहे.