नवाझ शरीफ यांना सत्ता सोडण्याचा पाकिस्तानी लष्कराचा सल्ला?
By admin | Published: September 1, 2014 01:54 PM2014-09-01T13:54:59+5:302014-09-01T16:47:34+5:30
पाकिस्तानमध्ये सध्याच्या राजकिय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर लष्कराने नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपद सोडण्याचा सल्ला दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. १ - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी राजीनामा द्यावा असा सल्ला पाकिस्तानी लष्कराने दिल्याचे वृत्त आहे. नवाझ शरीफ हे लांड्या लबाड्या करून पंतप्रधान झाल्याचा आरोप करत इम्रान खान व मौलवी कादरी यांनी पाकिस्तानात प्रचंड आंदोलन उभे केले आहे. मतदानाची व्यापक चौकशी करावी व तोपर्यंत शरीफ यांनी पायउतार व्हावे अशी मागणी करत या दोघांनी इस्लामाबादमध्ये प्रचंड मोठ आंदोलन उभारले आहे. दरम्यान पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने या वृत्ताचा इन्कार केला असून शरीफ यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा केला आहे.
पाकिस्तानमध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे नेते इम्रान खान यांनी सुरु केलेल्या आंदोलनाने सोमवारी हिंसक रुप घेतले. आंदोलकांनी पाकिस्तानमधील पीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या मुख्यालयात धडक देऊन चॅनलचे प्रसारण बंद पाडले. अखेर सैन्य आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी आंदोलकांना इमारतीबाहेर हुसकावून लावत चॅनलचे प्रसारण पुन्हा सुरु केले.
पाकिस्तानमध्ये १५ ऑगस्टपासून पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तहरीकचे मौलवी ताहिर उल कादरी यांनी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन दिवसेगणिक चिघळत असून सोमवारी आंदोलनाने आणखी हिंसक रुप घेतले. सोमवारी पावसाची हजेरी असूनही आंदोलकांनी पोलिसांचा विरोध झुगारुन इस्लामाबाद येथील सचिवालय परिसराचे गेट तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या भागात पाकिस्तानमधील मंत्री आणि पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. यानंतर आंदोलकांनी पीटीव्ही वाहिनीच्या मुख्यालयाला लक्ष्य केले. आंदोलकांनी मुख्यालयावर ताबा मिळवत चॅनलचे प्रसारण बंद पाडले. अखेरीस इम्रान खान आणि उल कादरी यांनी याप्रकरणात आमच्या कार्यकर्त्यांचा हात नाही असे स्पष्ट केले. तसेच संतप्त आंदोलकांनी तातडीने मुख्यालयाचा ताबा सोडावा असे आवाहनही केले. या दरम्यान सैन्य आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना मुख्यालयाबाहेर हुसकावून लावले आणि चॅनलचे पुन्हा प्रसारण सुरु झाले.
आंदोलकांनी हिंसक कृत्य न करता शांततामयपद्धतीने आंदोलन करावे असे आवाहन इम्रान खान यांनी केले आहे. तर ताहीर कादरी यांनी नवाझ शरीफ यांना राजीनामा देण्यासाठी २४ तासांचा कालावधी दिला आहे. पाक सैन्यानेही इस्लामाबादमधील पोलिसांना आंदोलकांवर बळाचा वापर करु नका असे निर्देश दिल्याचे समजते. हा वाद केवळ चर्चा आणि शांततामय मार्गानेच सोडवला जाऊ शकतो असे पाकच्या लष्करी अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागेल हे निश्चित मानण्यात येत असून लष्करानेच तसा सल्ला दिल्याचे वृत्त आहे.