भारताप्रमाणे सवलतीच्या दरात कच्चं तेल मिळेल या आशेनं पाकनं रशियापुढे हात पसरले, पण झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:38 PM2022-12-01T21:38:42+5:302022-12-01T21:39:05+5:30
Pakistan asks Russia for Cheap Crude Oil : भारत अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्च तेल खरेदी करत आहे. पाकिस्ताननंही यासाठी रशियापुढे हात पसरले.
युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले होते. अशा परिस्थितीत रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला. भारताने याचा फायदा घेत रशियाकडून मोठ्या सवलतीत कच्चे तेल विकत घेतले. भारत अजूनही रशियाकडून स्वस्त किंमतीत कच्चे तेल खरेदी करत आहे. आपला शेजारी देश पाकिस्तानही रशियाकडून स्वस्त कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी गेला होता. परंतु पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
रशियाने पाकिस्तानला स्वस्तात कच्चे तेल देण्यास नकार दिला. द न्यूज या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ ही मागणी घेऊन रशियाला गेले होते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करून कच्च्या तेलावर 30-40 टक्के सूट देण्याची मागणी केली होती. परंतु रशियाने ही मागणी फेटाळून लावली.
रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या शिष्टमंडळात पेट्रोलियम राज्यमंत्री मुस्सादिक मलिक, पेट्रोलियम सचिव मोहम्मद महमूद, मॉस्कोमधील पाकिस्तानच्या दूतावासातील संयुक्त सचिव आणि इतर अधिकारी यांचा समावेश होता. बुधवारी रशियन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही मागणी केली होती. आता गुरुवारी रशियाने कच्च्या तेलावर सूट देण्यास नकार दिला. वृत्तानुसार, चर्चा कोणत्याही ठोस निकालाशिवाय संपली. तसंच आपल्या निर्णयाची माहिती नंतर कूटनीतिक माध्यमातून कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानात पेट्रोल-डिझेलची महागाई
पाकिस्तानचे शिष्टमंडळ २९ नोव्हेंबरला मॉस्कोला रवाना झाले. कमी किमतीत कच्चे तेल मिळण्याच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी रशियन अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करणे हा या भेटीचा उद्देश होता. पाकिस्तान सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत आहे. भारताप्रमाणेच रशियाकडूनही स्वस्तात कच्चे तेल मिळेल, अशी पाकिस्तानला आशा होती. पण रशियाने नकार दिला. रिपोर्टनुसार, अन्य देशांना दिल्या जात असलेल्या किंमतीतच पाकिस्तानला कच्चे तेल पुरवले जाणार असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.