पाकिस्तानात इसिसवर बंदी
By admin | Published: August 30, 2015 12:54 AM2015-08-30T00:54:53+5:302015-08-30T00:54:53+5:30
पाकिस्तानने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आहे. तत्पूर्वी इराक व सिरियात थैमान घालणारी ही संघटना आपल्या भूभागामध्ये सक्रिय नसल्याचे पाकने
इस्लामाबाद : पाकिस्तानने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेवर बंदी घातली आहे. तत्पूर्वी इराक व सिरियात थैमान घालणारी ही संघटना आपल्या भूभागामध्ये सक्रिय नसल्याचे पाकने वारंवार सांगितले होते, हे उल्लेखनीय.
इस्लामिक स्टेट (इसिस) या संघटनेवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे, असे गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाच्या शिफारशीवरून हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.
संयुक्त राष्ट्राकडून बंदी घालण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तान सरकारला नियमितपणे माहिती दिली जाते.
इस्लामिक स्टेटला पाठिंबा देणारी भित्तीपत्रके व बॅनर पाकमध्ये सातत्याने दिसून येतात; मात्र सरकारने इसिस पाकमध्ये सक्रिय असल्याचे आतापर्यंत नाकारले आहे. ही संघटना पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हात-पाय पसरवत असल्याचे अलीकडचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. तालिबान नेता मुल्ला मोहंमद ओमरच्या मृत्यूनंतर इसिस संघटना अफगाणिस्तानात बळकट झाली आहे. पाकने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या यादीत मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हफीज सईदची संघटना जमात उद दावा, अफगाणिस्तानातील कुख्यात हक्कानी नेटवर्क आणि इस्लामिक स्टेटचा समावेश नसल्याचे वृत्त आल्यानंतर पाकने इसिसचा या यादीत समावेश केला.
पाकमध्ये वकिलाची हत्या
पाकिस्तानात उच्च न्यायालयाच्या एका वकिलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सैयद अमीर हैदर शाह असे या वकिलाचे नाव आहे. सैयद अमीर कारने घरी परतत असताना तीन संशयितांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. गुलशन-ए-इकबाल भागात हा हल्ला झाला. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते. गोळ्या लागल्यामुळे शाह गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तेथे तपासून त्यांना मृत घोषित करण्यात आले. (वृत्तसंस्था)