चीननं दाखवला पाकिस्तानला ठेंगा; इम्रान खान यांना कर्ज माफीसाठी जोडावे लागले हात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 12:52 PM2021-05-31T12:52:51+5:302021-05-31T12:53:15+5:30
पाकिस्तानला आपला 'आयरन ब्रदर' म्हणणाऱ्या चीनचा खरा चेहरा आता समोर येत आहे.
पाकिस्तानला आपला 'आयरन ब्रदर' म्हणणाऱ्या चीनचा खरा चेहरा आता समोर येत आहे. कंगाल झालेल्या पाकिस्ताननंचीनकडे ३ अरब डॉलरचे कर्ज माफ करण्याची विनंती केली होती. पण, चीननं पाकिस्तानला ठेंगा दाखवताना त्यांची ही विनंती अमान्य केली. China–Pakistan Economic Corridor अंतर्गत ऊर्जा प्रकल्पासाठी दिलेलं कर्ज माफ करावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे.
एशिया टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये तयार केल्या गेलेल्या ऊर्जा प्रकल्पात चीननं जवळपास १९ अरब डॉलरची गुंतवणूक केली आहे. चीननं पाकिस्तानच्या ऊर्जा खरीदीवर झालेल्या कराराची पुनर्रचना करण्याची विनंती फेटाळून लावली. कर्जात कोणत्याही प्रकारची सूट देण्यासाठी चीनी बँकाना त्यांच्या अटी व नियमात बदल करावा लागेल. चीनी बँक पाकिस्तान सरकारसोबत झालेल्या करारातील कोणत्याही नियमात बदल करण्यास तयार नाहीत.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे सीनेटर व उद्योगपती नौमान वजीर यांनी सांगितले की,नॅशनल इलेक्ट्रिक पॉवर रेग्युलेटरी अथॉरिटीनं जेव्हा खाजगी क्षेत्रांना ऊर्जा उत्पादनासाठी परवानगी दिली, तेव्हा टॅरिफ फार जास्त ठेवला गेला. पाकिस्तानच्या पॉवर सेक्टरमध्ये झालेल्या एका तपासणीत ही बाब समोर आली. कर्जाच्या ओझ्याखाली गेलेल्या पाकिस्तानवर डिफॉल्ट लिस्टमध्ये जाण्याचं संकंट ओढावलं आहे.
पाकिस्तानवर ३० डिसेंबर २०२०पर्यंत एकूण २९४ अरब डॉलरचं कर्ज होतं आणि ती त्यांच्या एकूण जीडीपीचा १०९ टक्के आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते २०२३पर्यंत हे अंतर २२० टक्के इतकं होऊ शकतं. २०२३ला इम्रान खान यांच्या सरकारला पाच वर्ष पूर्ण होत आहे. इम्रान यांनी निवडणुकीपूर्वी नवीन पाकिस्तान तयार करण्याचे वचन दिलं होतं, शिवाय त्यांनी पाकिस्तान कर्जासाठी कोणासमोर भीक मागणार नाही, असेही वचन दिलं होतं. याच विधानावरून आता विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. पाकिस्तान पीपुल्प पार्टीनचे चेअरमन बिलावल भुट्टो जरदारी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली.