भयंकर! पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण स्फोट; २० जणांचा मृत्यू, ३० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 11:13 AM2024-11-09T11:13:53+5:302024-11-09T11:15:35+5:30
पाकिस्तानमधील क्वेटा येथील रेल्वे स्थानकाच्या आत भीषण स्फोट झाला असून त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमधील क्वेटा येथील रेल्वे स्थानकाच्या आत भीषण स्फोट झाला असून त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. क्वेटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद बलोच यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत २० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
बलोच पुढे म्हणाले की, ही घटना आत्मघाती स्फोट असल्यासारखं वाटतं आहे, परंतु आता काहीही सांगू शकत नाही. स्फोटाचे स्वरूप शोधण्यासाठी तपास सुरू आहे. त्याआधी ईधी रेस्क्यू सर्व्हिसचे प्रमुख झिशान यांनी सांगितलं की, हा स्फोट रेल्वे स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवर झाला आहे.
बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी एका निवेदनात सांगितलं की, पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत. स्फोटाचे स्वरूप तपासले जात असल्याचं रिंद यांनी म्हटलं. बॉम्बशोधक पथक घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.
रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आल्याचं सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं. तसेच जखमींना वैद्यकीय मदत दिली जात आहे. व्हि़डीओमध्ये रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ढिगारा दिसत आहे. तसेच ज्यावेळी स्फोट झाला तेव्हा एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरून पेशावर येथे रवाना होत होती.