पाकिस्तानात हिंदूंची दुकाने जाळली, मालमत्तेच्या हानीची सरकार भरपाई करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 03:50 AM2019-05-30T03:50:59+5:302019-05-30T03:51:06+5:30
अल्पसंख्य हिंदू समाजाच्या डॉक्टरने पवित्र ग्रंथाची पाने फाडून त्यात औषधी गुंडाळून दिल्याच्या कथित घटनेनंतर जमावाने हिंदूंच्या मालकीची दुकाने पेटवून दिली.
कराची : अल्पसंख्य हिंदू समाजाच्या डॉक्टरने पवित्र ग्रंथाची पाने फाडून त्यात औषधी गुंडाळून दिल्याच्या कथित घटनेनंतर जमावाने हिंदूंच्या मालकीची दुकाने पेटवून दिली. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात ही कथित ईशनिंदा घडली असून, आरोपी डॉक्टर रमेश कुमार याला देशाच्या अतिशय कठोर अशा ईशनिंदा प्रतिबंधक कायद्याखाली सोमवारी अटक करण्यात आली.
व्यवसायाने जनावरांचा डॉक्टर असलेल्या रमेश कुमार याच्याविरुद्ध पोलिसांकडे स्थानिक मौलवीने तक्रार केल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पाकिस्तानात इस्लामचा अपमान करणाऱ्याला ईशनिंदा कायद्याखाली मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी डॉक्टरला ताब्यात घेतले तेव्हा संतप्त जमावाने हिंदूंच्या मालकीच्या दुकानांना पेटवून दिले आणि सिंध प्रांतातील फुलाद्योन गावातील (जिल्हा मिरपूरखास) रस्त्यावर टायर जाळले, असे वृत्त एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिले.
जमावाने रमेश कुमार याच्या मालकीचा दवाखाना आणि हिंदूंच्या मालकीचे औषधाचे दुकान व इतर दोन दुकाने पेटवून दिली. टायर्स जाळून जमावाने रस्तेही अडवून टाकले होते. निदर्शकांनी काही दुकानेही लुटल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून स्थानिक अधिकाऱ्यांनी निमलष्करी तुकडी मागवली. दंगलींत भाग घेणाºयांवर पोलिसांनी गुन्हेही दाखल केले आहेत. ‘घटना दुर्दैवी आहे. आम्ही डॉक्टरला ताब्यात घेतले असून, घटनेची चौकशी केली जात आहे’, असे मिरपूरखासचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जावेद बलोच यांनी सांगितले. बलोच म्हणाले, ‘गुन्हा दाखल झाला असून, अनुचित घटना टाळण्यासाठी गावात आम्ही तळ टाकला आहे. परिस्थिती आता सामान्य आहे’. हिंदू समाजाच्या मालमत्तेची नासधूस करणाºयांवर आम्ही कारवाई करू.
मालमत्तेची नासधूस केल्याच्या आरोपावरून आम्ही काही संशयितांना स्थानबद्ध केल्याचेही बलोच
म्हणाले.
हिंसाचारात ज्यांच्या मालमत्तेची हानी झाली त्यांना सरकार भरपाई देईल, असे मिरपूरखासच्या उपायुक्तांनी सांगितले.