बुरहान वानी टपाल तिकिटावर, दहशतवाद्यांचा 'शहीद' म्हणून गौरव; पाकिस्तानचं शेपूट वाकडंच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 11:36 AM2018-09-20T11:36:55+5:302018-09-20T11:39:25+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. पण दुसरीकडे, त्यांच्या टपाल खात्यानं दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं छापली आहेत.
इस्लामाबादः 'हम नही सुधरेंगे' हेच पाकिस्तानच ब्रीद असल्याचं त्यांच्या टपाल खात्यानं पुन्हा दाखवून दिलं आहे. काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्करानं कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांना शहीद ठरवून, बुरहान वानी आणि त्यांच्या साथीदारांच्या नावे टपाल तिकिटं काढून त्यांनी आपल्या 'नापाक' वृत्तीचंच दर्शन घडवलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. त्यांचा हा पवित्रा आश्चर्याचा धक्का देणाराच आहे. परंतु, उशिरा का होईना, शहाणपण सुचलं बुवा, अशी प्रतिक्रिया भारतीय व्यक्त करताहेत. या पत्राची बातमी येऊन काही तास उलटत नाहीत, तोच पाकिस्तानच्या टपाल खात्याने छापलेली २० नवी तिकिटं समोर आली आहेत. त्यावर जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे फोटो आहेत. त्यांचा उल्लेख पीडित असा करून त्यांनी आपला भारतद्वेष पुन्हा दाखवला आहे.
काश्मीरमधील जनतेचे प्रश्न स्थानिक पातळीपासून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या हेतूने ही तिकिटं छापल्याचं टपाल खात्याच्या एका अधिकाऱ्यानं इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं. ८ जुलै २०१६ रोजी अनंतनागमधील चकमकीत ठार झालेला दहशतवादी बुरहान वानीचा उल्लेख या तिकिटावर 'फ्रीडम आयकॉन' असा केला आहे. रासायनिक शस्त्रांचा वापर, पॅलेट गनचा वापर, सामूहिक कब्र असे शब्दही या तिकिटांवर आहेत. भारतीय लष्कर काश्मीरमधील जनतेवर किती अत्याचार करतंय, असा आभास त्यातून निर्माण करायचा आहे.
परंतु, भारताला बदनाम करण्याची ही खेळी पाकिस्तानवरच उलटू शकते. दहशतवादाला खतपाणी घालण्याचं, दहशतवाद्यांना आश्रय देण्याचं काम पाकिस्तान करत असल्याचं वारंवार सिद्ध झालं आहे. आता दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं काढून त्यांनी स्वतःच आपल्या कुकर्मांची कबुली दिली आहे, स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे.