इम्रान खान यांच्या पार्टीवर बंदी घातली जाणार? संरक्षणमंत्र्यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 06:45 PM2023-05-24T18:45:24+5:302023-05-24T18:45:47+5:30
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी हा दावा केला.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होत नाहीत. इम्रान खान यांची पार्टी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी घातली जाऊ शकते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी हा दावा केला.
ख्वाजा आसिफ म्हणाले की, पीटीआयवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. ते पुढे म्हणाले की, पीटीआयने पाकिस्तानच्या पायावर हल्ला केला आहे. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. हे सहन होत नाही.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने 9 मेच्या आरोपींवर लष्करी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे विधेयक मंजूर केले आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी नॅशनल असेंब्लीत हा ठराव मांडला. इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ 9 मे रोजी पीटीआय कार्यकर्त्यांनी लष्करी आस्थापनावर हल्ला केला होता.
इम्रान खान यांचा जामीन 8 जूनपर्यंत वाढवला
याआधी, इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यासाठी मंगळवारी कोर्टातून दिलासादायक बातमी आली होती. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने (एटीसी) गेल्या मार्चमध्ये कोर्ट संकुलात झालेल्या हिंसाचाराच्या आठ प्रकरणांमध्ये इम्रान खानचा अंतरिम जामीन 8 जूनपर्यंत वाढवला. दुसरीकडे, इस्लामाबाद अकाउंटेबिलिटी कोर्टाने बुशरा बीबीला अल-कादिर ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात 31 मे पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला.
इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल
18 मार्च रोजी पीटीआयचे प्रमुख इम्रान खान यांना कोर्टात हजर करताना कोर्टाच्या आवारात पोलीस कर्मचारी आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाप्रकरणी इम्रान खान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने इम्रान खान यांच्या अंतरिम जामिनात वाढ केली. इम्रान खान यांच्याकडून 190 दशलक्ष पौंडांच्या सेटलमेंट प्रकरणात एनएबीने इम्रान खान यांची दोन तास चौकशी केली.