Pakistan Crisis: पाकिस्तान म्हाताऱ्यांचा देश होणार! निम्म्याहून अधिक तरुणांना देश सोडायचाय, धक्कादायक रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 07:18 AM2023-03-15T07:18:19+5:302023-03-15T07:19:06+5:30
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली आहे. दहशतवादावर खैरात करणाऱ्या पाकिस्तानला आता सौदी अरब, आयएमएफ आणि भारताविरोधात मदत करणारा चीनही मदतीसाठी तयार नाहीय.
एकाचवेळी जन्माला आलेल्या दोन देशांमध्ये एक द्वेश, दहशतवादाच्या मार्गाने चालला, दुसरा पहिल्या देशाच्या द्वेशाविरोधात, दहशतवादाविरोधात लढत विकासाच्या मार्गावर चालला. आज पहिला देश सर्वदृष्ट्या संपण्याच्या उंबरठ्यावर तर दुसरा देश जगातील महाशक्ती बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. हो, पाकिस्तान आणि भारत बद्दलच बोलले जात आहे. आज पाकिस्तान म्हाताऱ्यांचा देश बनण्याच्या उंबरठ्यावर आहे तर भारत तरुणांचा देश बनला आहे.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली आहे. दहशतवादावर खैरात करणाऱ्या पाकिस्तानला आता सौदी अरब, आयएमएफ आणि भारताविरोधात मदत करणारा चीनही मदतीसाठी तयार नाहीय. महागाई एवढी वाढली आहे की, पाकिस्तानींना रोज मोजून मापून दाणे खायची वेळ आली आहे. एलपीजी तिथे प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून दिला जात आहे. एवढ्या सगळ्या संकटात पाकिस्तानची साथ आता तेथील तरुणांनी देखील सोडल्याचे समोर येत आहे.
६७ टक्के तरुणांनी पाकिस्तान सोडण्याची भाषा केली आहे. गेल्या सर्व्हेमध्ये पाकिस्तान सोडण्याची इच्छा असलेल्यांचे प्रमाण हे ६२ टक्के होते. पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट इकॉनॉमिक्स (पीआईडीई) चे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. फहीम जहांगीर खान यांच्यानुसार देशातील ६७ टक्के तरुण हे पाकिस्तान सोडण्यासाठी चांगल्या संधीच्या शोधात आहेत. पाकिस्तानमध्ये ३१ टक्के तरुण हे बेरोजगार आहेत.
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरील आयोजित 'आयकॉनफेस्ट' चर्चासत्रात ते बोलत होते. सरकारला या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तरुणांच्या समस्यांकडे लक्ष देण्य़ास सांगितले आहे. पाकिस्तानमध्ये 200 हून अधिक विद्यापीठे आहेत, त्यात हजारो विद्यार्थी शिकत आहेत, परंतू त्यांना नोकरी मिळत नाहीय. पदवी ही नोकरीची हमी नाहीत तर कंपन्या त्यांच्याकडून स्कीलची मागणी करत आहेत. त्यामुळे शिक्षकांबरोबरच शासनानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.