पाकमध्ये दर्गा व्यवस्थापकाने २0 जणांना केले ठार
By admin | Published: April 3, 2017 04:50 AM2017-04-03T04:50:50+5:302017-04-03T04:50:50+5:30
पाकिस्तानमधील सरगोधा शहरात शनिवारी रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने २0 जणांची चाकूने भोसकून हत्या केली.
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सरगोधा शहरात शनिवारी रात्री एका दर्ग्याच्या व्यवस्थापकाने २0 जणांची चाकूने भोसकून हत्या केली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण असून, दोन महिला व ३ अन्य जण जखमी झाले आहेत.
सरगोधाचे उपायुक्त लियाकत अली चट्टा यांनी सांगितले की, अहमद गुज्जर दर्ग्याचा व्यवस्थापक अब्दुल वाहीद याने दर्ग्यात आलेल्यांना चाकूने भोसकून आणि दांडुक्याने मारहाण करून ठार केले. मारण्यापूर्वी या अनुयायांना बेशुद्ध करण्यात आले होते. अब्दुल वाहिद हा विक्षिप्त असल्याचे सांगण्यात येते. जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार मृत्युमुखी पडलेले सर्व जण पंजाब प्रांताच्या विविध भागांत राहणारे आहेत. ही घटना घडल्यानंतर दर्ग्यातील एका महिलेने पळून जाऊ न इस्पितळ गाठले आणि या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे हे हत्याकांड उघड झाले. पोलिसांनी वाहिद आणि त्याच्या पाच सहकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू़ आहे.
तालिबानचा हल्ला ; आदिवासींची जोरदार निदर्शने
पेशावर : पाकिस्तानच्या पाराचिनार शहरात शोकसंतप्त आदिवासींनी तालिबानच्या हल्ल्यात ठार झालेल्या लोकांच्या मृतदेहांसह शनिवारी जोरदार निदर्शने केली. त्यांनी सुरक्षेतील ढिलाईवर टीका करताना हल्ल्याच्या सूत्रधारांवर कारवाईची मागणी केली. पाकिस्तान तालिबानने कुर्रम प्रांताच्या पाराचिनार
शहरातील शिया इमामबाड्याला लक्ष्य करून शक्तिशाली कारबॉम्बस्फोट घडवून आणला. यात २४ लोक ठार तर इतर १०० जखमी झाले होते.
पाराचिनार येथील लोकांनी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहांसह निदर्शने करून हल्ल्यात सहभागी लोकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. चर्चेनंतर निदर्शकांनी हल्ल्यात ठार झालेल्यांचे मृतदेह इमामबाड्यात नेले. तेथून ते दफनविधीसाठी त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येणार आहेत.
स्थानिक आदिवासींनी तीन दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. रुग्णालयात १३५ जखमींना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ३७ जणांना हवाईमार्गे पेशावर हलविण्यात आले. ४० जणांवर उपचार सुरू
आहेत. (वृत्तसंस्था)