पाकिस्तानला दहशतवादी देश जाहीर करा, अमेरिकन काँग्रेसमध्ये आणले विधेयक
By Admin | Published: September 21, 2016 10:47 AM2016-09-21T10:47:20+5:302016-09-21T10:47:20+5:30
संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीर मुद्यावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे.
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २१ - संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीर मुद्यावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तानला आणखी एक धक्का बसला आहे. दोन अमेरिकन खासदारांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी विधेयक मांडले आहे.
पाकिस्तान फक्त अविश्वास पात्र सहकारीच नाहीय तर, पाकिस्तानने अमेरिकेच्या शत्रूंना अनेक वर्ष मदत केली आहे असे दहशतवाद विरोधातील उपसमितीचे चेअरमन टेड पोई यांनी सांगितले. पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला आश्रय दिला. हक्कानी नेटवर्क बरोबर त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे दहशतवादाच्या लढाईत पाकिस्तान कोणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होते असे पोई म्हणाले.
दाना रोहराबाचेर आणि टेड पोई या दोन रिपब्लिकन सदस्यांनी हे विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये मांडले. उरी दहशतवादी हल्ल्यावरुन अमेरिकेने आधीच पाकिस्तानला फटकारले आहे. रशियानेही पाकिस्तान बरोबरचा संयुक्त युद्ध सराव रद्द केला आहे.
कुटुनितीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडण्याच्या भारताच्या रणनितीला यश मिळत आहे. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये काश्मीर मुद्यावरुन भारताला घेरण्याची पाकिस्तानची रणनिती आहे. त्यासाठी पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पाकिस्तान आता एकाकी पडले आहे.