Pakistan Economic Crisis: श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, का उद्धभवली ही परिस्थिती..?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:32 PM2022-07-13T14:32:57+5:302022-07-13T14:33:05+5:30
Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याची माहिती आहे.
Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. यातच राष्ट्रपतींनी देश सोडून पलायन केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. भारताकडून श्रीलंकेला शक्य ती मदत केली जात आहे. दरम्यान, श्रीलंकेपाठोपाठ आता पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत जगातील आघाडीच्या रेटिंग एजन्सींनी इशारा दिला आहे. एजन्सींकडून पाकिस्तानात आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली
आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात लक्षणीय घट झाली असून कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेचे आणखी एक मोठे कारण म्हणजे जगात मंदीच्या सावटामुळे पाकिस्तानच्या कमाईच्या संधीही मर्यादित होत आहेत. सध्या त्यांच्या कमाईतही वाढ होण्याची शक्यता नाही. याशिवाय तेथील परिस्थिती पाहून गुंतवणूकदारही अंतर राखत आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
रेटिंग एजन्सीचा अंदाज
फिचकडून 17 देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये पाकिस्तान, ट्युनिशिया, घाना, इथिओपिया, ताजिकिस्तान, अर्जेंटिना, बेलारूस इत्यादी देशांचा समावेश आहे. एजन्सीने जारी केलेल्या अहवालात पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे दिवाळखोर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांत, परिस्थिती हाताळण्यासाठी पाकिस्तान सरकारने श्रीमंतांवर सुपर टॅक्स लादणे, लक्झरी वस्तूंच्या आयातीवर बंदी घालणे यासारखी पावले उचलली आहेत.
पाकिस्तानातील परिस्थिती का बिघडली?
पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा 10 अब्ज डॉलरच्या खाली गेला आहे. देशातील महागाईचा दर 20 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया घसरला असून तो 200 रुपयांच्या पुढे गेला आहे. पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत आहे. ज्या देशांशी पाकिस्तानचे व्यापारी संबंध आहेत, तेथे मंदीच्या भीतीने व्यापारात घट झाली आहे.
श्रीलंकेत महागाई दर 50 टक्क्यांवर पोहोचला
पाकिस्तानची ही परिस्थिती पाहून असे वाटते की, तेही श्रीलंकेच्या वाटेवर जात आहेत. श्रीलंकेतही या परिस्थितीची सुरुवात परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यापासून झाली. यानंतर रेटिंग एजन्सींनी तेथील रेटिंग कमी केले. त्यामुळे श्रीलंकेतील गुंतवणुकीवर परिणाम झाला. एवढेच नाही तर सहज कर्ज मिळणे बंद झाले. सध्या श्रीलंकेचा महागाईचा दर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे.