पाकिस्तान कर्जाच्या सापळ्यात! केली आणखी २ अब्ज डॉलर्सची मागणी; एकूण कर्ज किती?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 10:43 AM2024-01-28T10:43:20+5:302024-01-28T10:44:52+5:30
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधानांनी मागितले अतिरिक्त कर्ज
Pakistan Economic Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने मदतीसाठी आता चीनचे दरवाजे ठोठावले आहेत. पाकिस्तानची सध्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे रोख रकमेचा तुटवडा. हे पाहता पाकिस्तान सरकारने शी जिनपिंग यांच्या सरकारकडे २ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची मागणी केली आहे. चीन हा पाकिस्तानचा जवळचा मित्र असल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. अन्वर उल हक कक्कर सध्या पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत.
कक्कर यांनी स्वतः चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना पत्र लिहून हे कर्ज लवकरात लवकर देण्याची विनंती केली आहे. चीन सरकार वेळोवेळी अब्जावधी डॉलर्सची मदत देऊन पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढत असल्याने पाकिस्तान सरकारने चीनचे आभार मानले आहेत. चीनने दिलेले ४ अब्ज डॉलर्सचे कर्ज पाकिस्तान कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा स्थिर ठेवण्यासाठी वापरत आहे.
युएई, सौदी अरेबिया, IMF कर्ज
याआधी यूएई आणि सौदी अरेबियानेही पाकिस्तानला कर्जाद्वारे मदत केली आहे. सौदी अरेबियाने दिवाळखोरी होऊ नये म्हणून स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये ५ अब्ज डॉलर्सची रक्कम कर्ज म्हणून जमा केली. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF च्या मदतीचीही गरज आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या अंतरिम सरकारने IMF ला आपला प्रस्ताव चर्चेसाठी पाठवण्याची विनंती केली आहे. इस्लामाबादला IMF कडून 1.2 अब्ज डॉलर्स कर्जाची अपेक्षा आहे.
पाकिस्तानचे एकूण कर्ज किती?
पाकिस्तानची आर्थिक गरिबीची स्थिती आहे. जर IMF, जागतिक बँक आणि चीन, UAE सारख्या देशांनी कर्जाची मागणी केली किंवा मदत करणे थांबवले तर पाकिस्तान दिवाळखोर होऊ शकतो. २०२३ च्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानवर सुमारे १२५ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज आहे. या संपूर्ण रकमेपैकी एक तृतीयांश रक्कम पाकिस्तानने चीनकडून घेतली आहे. आता चीनने आणखी कर्ज मंजूर केले तर त्यामुळे पाकिस्तानवरील कर्जाचा ताण आणखी वाढणार हे उघड आहे.