Pakistan Economic Crisis:पाकिस्तानचे आणखी संकट वाढले! परकीय चलनाचा साठा संपला, सुझुकी मोटर्सनेही बंद केली फॅक्टरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 05:35 PM2023-02-21T17:35:51+5:302023-02-21T19:12:14+5:30
Pakistan Economic Crisis: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, पीठ, तेला तसेच इंधनाच्या किंमती महागल्या आहेत. नुकतेच सर्वात मोठ्या रिफायनरीला कुलूप लागले आहे.
Pakistan Economic Crisis: पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला आहे. डाळ, पीठ, तेला तसेच इंधनाच्या किंमती महागल्या आहेत. नुकतेच सर्वात मोठ्या रिफायनरीला कुलूप लागले आहे. आता पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि आर्थिक संकटामुळे पाकिस्तानातील अनेक बड्या कंपन्यांना टाळे ठोकण्यात आले आहे.
सध्या पाकिस्तानकडे फक्त ३.१६ अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा शिल्लक आहे. पाकिस्तानकडे आयात करण्यासाठी पैसे नाहीत. देशात कच्च्या मालाचा तुटवडा आहे. पाकिस्तानही बंदरांवर कंटेनर सोडण्यास असमर्थ आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पाकिस्तानमधील सुझुकी मोटर कॉर्पने २ फेब्रुवारी रोजी आपले स्थानिक युनिट आधीच बंद केले आहे. याशिवाय टायर-ट्यूब बनवणाऱ्या गांधार टायर अँड रबर कंपनीने १३ फेब्रुवारीला प्लांट बंद केला. याशिवाय खते, पोलाद आणि कापड बनवणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन कायमचे बंद केले आहे.
पाकिस्तानमध्ये यापूर्वी अनेक मोठ्या कंपन्या बंद झाल्या आहेत, त्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. यामध्ये मिल्लत ट्रॅक्टर्स लिमिटेड, ऍग्रो फर्टिलायझर्स लिमिटेड, GSK Plc चे पाकिस्तान युनिट, फौजी फर्टिलायझर्स बिन कासिम लिमिटेड, अमरेली स्टील्स लिमिटेड आणि निशात चुनियान लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे.
याआधी पाकिस्तानातील कराची येथे असलेली सर्वात मोठी रिफायनरीही बंद करावी लागली होती. कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे येथे उत्पादन थांबले होते. परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानकडून कच्चे तेल विकत घेण्यासाठी पैसेच शिल्लक नव्हते. मात्र, नंतर कच्च्या तेलाचा पुरवठा झाल्यानंतर येथे पुन्हा उत्पादन सुरू करण्यात आले.