Pakistan Economic Crisis: बुडत्याला काडीचा आधार! दारोदार भटकणाऱ्या पाकिस्तानला 'हा' देश करणार १ बिलियन डॉलरची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 03:21 PM2023-04-15T15:21:21+5:302023-04-15T15:24:58+5:30
Pakistan Economic Crisis: कर्जासाठी दारोदार भटकणाऱ्या पाकिस्तानसाठी एका देशानं हात पुढे केला आहे.
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तान अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (International Monetary Fund) बेलआउट पॅकेज मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण हा मार्ग त्याच्यासाठी सोपा नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तान आपल्या 'मित्र' देशांकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. परंतु आता पाकिस्तानसाठी एक किंचितसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीनं पाकिस्तानला १ बिलियन डॉलर्सची (UAE Give Loan to Pakistan) आर्थिक मदत मंजूर केली आहे आणि पैसे मिळवण्यासाठी आता कागदोपत्री कार्यवाही सुरू आहे.
कर्जासाठी दारोदार फिरणाऱ्या पाकिस्तानची स्थिती आणखी बिकट होणार, आता संयुक्त राष्ट्रानंही दिला इशारा
या प्रकरणाची माहिती देताना पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी सांगितलं की, संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानला १ बिलियन डॉलर्सच्या आर्थिक मदतीबाबत करार झाला असून त्याची माहिती आयएमएफलाही देण्यात आली आहे. आता स्टेट बँक ऑफ पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीचे अधिकारी यांच्यात कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होत आहे. यासोबतच चीननं पाकिस्तानला १.३ बिलियन डॉलर्स दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यापैकी ३०० मिलियन डॉलर्सचे कर्ज चीन रोलओव्हर करेल. अशा परिस्थितीत या पैशातून पाकिस्तानचा परकीय चलन साठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सर्वात मोठं आर्थिक संकट
पाकिस्तान ७५ वर्षांतील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून १.१ बिलियन डॉलर्सचं पॅकेज मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हा पैसा आयएमएफच्या २०१९ मध्ये ६.५ बिलियन डॉलर्सच्या बेलआउटचा एक भाग आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पाकिस्तान आयएमएफच्या या पॅकेजची वाट पाहत आहे. दरम्यान, आयएमएफच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यास सहमती दर्शवली असल्याचंही अर्थमंत्रालयानं सांगितलं.
IMF program — 9th Review Update:
— Ishaq Dar (@MIshaqDar50) April 14, 2023
UAE authorities have confirmed to IMF for their bilateral support of US $ One billion to Pakistan.
State Bank of Pakistan is now engaged for needful documentation for taking the said deposit from UAE authorities.
AlhamdoLilah!
जानेवारीतही युएईकडून मदत
संयुक्त अरब अमिरातीनं यापूर्वी २०२३ मध्ये पाकिस्तानला २ बिलियन डॉलरचं कर्ज दिलं होतं. एकीकडे पाकिस्तानवर कर्जफेडीचा धोका असताना, दुसरीकडे देशातील सर्वसामान्य जनतेची महागाईमुळे दयनीय अवस्था झाली आहे. पाकिस्तानमधील महागाईनं ५० वर्षांचा विक्रम मोडला आहे. सरकारकडून वाटल्या जाणाऱ्या पिठासाठी लोकांमध्ये मारामारी सुरू असल्याचंही समोर आलं होतं. अनेक ठिकाणी तर पीठाच्या रांगेत चेंगराचेंगरी झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या.