Pakistan Economic Crisis : पाकिस्तान बोलत होता खोटं; IMF नं खडसावलं, “खोटे दावे करून पैसे मिळणार नाहीत”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 04:48 PM2023-05-08T16:48:07+5:302023-05-08T16:51:56+5:30
मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या समोरील अडचणी आणखी वाढत आहेत. पाहा नक्की काय घडलं.
पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. महागाईनं जनताही अधिक त्रस्त त्रस झाली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या देशाला इतरांसमोर हात पसरावे लागत आहेत. या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याची संपूर्ण आशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर (IMF) आहे. पण आता पाकिस्ताननं असं काम केलंय की त्यांना IMF कडूनही मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या मदतीसाठी IMF ने घातलेल्या सर्व अटी मान्य केल्याचा पाकिस्तानचा दावा आयएमएफनं फेटाळून लावलाय.
इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणार्या पाकिस्तानचा डाव आयएमएफनं पकडला असून त्याला मोठा धक्का दिला आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या या देशाला आर्थिक मदत देण्यासाठी आयएमएफनं काही कठोर अटी घातल्या होत्या. यानंतर महागाईने होरपळलेल्या पाकिस्तान सरकारनं बेलआउट पॅकेजचा हप्ता मिळवण्यासाठी ठेवलेल्या सर्व अटींची पूर्तता केल्याचा दावा त्यांच्यासमोर अनेकदा केला. असे दावे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि अर्थमंत्री इशाक दार यांनी केले होते.
परंतु द एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्रानुसार, आयएमएफनं शुक्रवारी एक निवेदन जारी केलं, नवव्या पुनरावलोकनासाठी आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण करण्याचा पाकिस्तान सरकारचा दावा फेटाळला गेला असल्याचं निवेदन आयएमएफनं निवेदनाद्वारे सांगितल्याचं द एक्सप्रेस ट्रिब्यूननं म्हटलंय. दरम्यान, पाकिस्ताननं २०१९ च्या आयएमएफसोबत बेलआऊट पॅकेजच्या करारांतर्गत पहिला हप्ता देण्यासाठी मदत मागितली आहे.
आयएमएफच्या अटी
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (IMF) पाकिस्तानसमोर ज्या अटी ठेवल्या आहेत, त्यात तीन प्रमुख अटी आहेत. पहिली अट अशी आहे की पाकिस्तानला वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून १७० अब्ज रुपये वसूल करण्यास सांगितलं आहे. यापूर्वीही पाकिस्ताननं देशात याची अंमलबजावणी केल्याचा दावा केला होता. दुसरी मोठी अट म्हणजे पाकिस्तानला वस्तूंच्या निर्यातीत करात सूट द्यावी लागेल.
तिसर्या अटीबद्दल सांगायचं तर, कोणत्याही किंमतीत आपल्या परकीय चलनाच्या साठ्यात डॉलरची कमतरता होऊ नये. पाकिस्ताननं या तीन अटी पूर्ण केल्या तरच त्याला कर्ज मिळणार असल्याचं सांगण्यात आलंय. यानंतर काही काळापासून पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी या अटी मान्य केल्याचा वारंवार दावा केला . पण IMF च्या आढाव्यात हे दावे खोटे ठरले असल्याचं सांगण्यात आलंय.