Pakistan Election 2024 : नेल कटर, सिमकार्ड, वांगी... विचित्र निवडणूक चिन्हे, पाकिस्तानमध्ये मतदानाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 08:58 AM2024-02-08T08:58:08+5:302024-02-08T08:59:48+5:30
Pakistan Election 2024 : पाकिस्तानची ही निवडणूक अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे.
आर्थिक आणि राजकीय पेचप्रसंगातून जात असलेल्या पाकिस्तानसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पाकिस्तानातील जनता आज केंद्रीय आणि प्रांतीय सरकारांच्या निवडणुकांसाठी मतदान करत आहे. पाकिस्तानची ही निवडणूक अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे.
निवडणूक चिन्हाबाबतही असाच वाद निर्माण झाला होता, जेव्हा निवडणूक आयोगाने बॅट हे देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणून नाकारले होते. आता इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना मिळणाऱ्या निवडणूक चिन्हांवरून सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील निवडणुकीसाठी उमेदवारांना दिलेली चिन्हे खूपच मजेशीर आहेत.
राजकीय पक्षांना 150 तर इतर अपक्ष उमेदवारांना 174 निवडणूक चिन्हे देण्यात आली आहेत. यामध्ये गाढव गाडी, प्रेसिंग बोर्ड, वाटी, चिकन, वांगी, बूट, वॉश बेसिन, नेल कटर, मोबाईल फोन चार्जर, सिमकार्ड, स्क्रू, चमचा, पॅन, फुगा, बेल, सायकल, दुर्बिण, बादली, बल्ब, फुलपाखरू, उंट, तोफ, खुर्ची, दिवा, मगर, हत्ती, पंखा, मासे, कारंजे, दार, गोफ, प्रेस, जीप, झाडू, चावी, शिडी, कप, बंदूक, अंगठी, ऑटोरिक्षा, हेल्मेट, पथदिवे, तलवार, ट्रॅक्टर आणि टायर निवडणूक चिन्ह म्हणून देण्यात आली आहेत.
अलीकडेच, इम्रान खान यांच्या पक्षाचे चिन्ह बॅट हे निवडणुकीतून काढून घेतल्याने मोठा गदारोळ झाला होता. मात्र निवडणूक चिन्हावरून पाकिस्तानात गदारोळ होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही निवडणूक चिन्हावरून विवाद झाला आहे. दरम्यान, अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह निवडण्याची संधी दिली जाते, परंतु अनेक वेळा निवडणूक अधिकारी त्यांना निवडणूक चिन्ह देतात आणि विचित्र निवडणूक चिन्ह उमेदवाराला अडचणीत आणतात.
निवडणूक ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे. निवडणुकीच्या काळात देशातील जनता आपल्या आवडीच्या उमेदवाराची निवड करते. कुठे या निवडणुका मतदान यंत्राद्वारे तर कधी बॅलेट पेपरद्वारे घेतल्या जातात. या दोन्ही पद्धतींमध्ये उमेदवाराचा फोटो मतदाराला दिसत नाही. अशा स्थितीत तो उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह पाहून मतदान करतो.
पाकिस्तानचे लोकही आज म्हणजेच गुरुवारी त्यांच्या नवीन सरकारच्या स्थापनेसाठी मतदान करत आहेत. पाकिस्तान असा देश आहे, ज्याची ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या लिहू किंवा वाचू शकत नाही. ग्रामीण भागात हा आकडा 50 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी उमेदवाराची ओळख हेच त्यांचे निवडणूक चिन्ह बनते.
एकूण 5121 हून अधिक उमेदवार आमनेसामने
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीत एकूण 5121 हून अधिक उमेदवार आमनेसामने आहेत. यामध्ये 4807 पुरुष, 312 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे. तसेच, चार विधानसभांच्या निवडणुकीत एकूण 12,695 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात 12,123 पुरुष, 570 महिला आणि दोन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे.
अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा सील
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये देशभरात सुमारे 650,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या निवडणुकीत देशातील 12.85 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा सील केल्या आहेत. मतदान अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली 90 हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान साहित्य पोहोचवण्यात आले. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे पाकिस्तानमधील नागरिकांसह जगाचे लक्ष लागले आहे.