पाकिस्तान निवडणुकीत हेराफेरीचे आरोप; आयोगाने पुन्हा मतदान घेण्याचे दिले आदेश, राजकीय पक्षांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 02:00 PM2024-02-11T14:00:28+5:302024-02-11T14:07:03+5:30
Pakistan Election : पीटीआयने देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर हेराफेरीचा आरोप केला आहे.
पाकिस्तान निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांमुळे लोक रस्त्यावर उतरले आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे समर्थन असलेले नेते आज देशभरात निदर्शने करत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. पीटीआयने देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर हेराफेरीचा आरोप केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, निवडणूक आयोगाचा हा आदेश केवळ त्या जागांसाठी आहे, ज्या ठिकाणी मोठी हेराफेरी, मतपत्रिका हिसकावणे, मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तर इतर जागांवर फेरनिवडणूक होणार नाही.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला अनेक भागात मतदान केंद्रांवरून मतदान साहित्य हिसकावून घेतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने हे निर्देश जारी केले आहेत. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, मतदान साहित्य हिसकावून नुकसान झाल्याच्या तक्रारींनंतर निवडणूक आयोगाने देशभरातील सर्व विविध मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश जारी केले आहेत.
निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मतदान संपल्यानंतर चौथ्या दिवशीही निवडणुकीचे नेमके निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांच्या पीटीआयला 100 जागा, नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एनला 73 जागा आणि बिलावलच्या पक्षाला 52 जागा मिळताना दिसत आहेत. पण, काही जागा अशा आहेत की, जेथे हेराफेरीच्या आरोपांमुळे चौथ्या दिवशीही निकाल जाहीर होऊ शकला नाही. या जागांवरच पुन्हा मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने यासाठी 15 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.
पीटीआयवर निवडणुकीपूर्वी बंदी
घोटाळ्याच्या आरोपांनी घेरलेले इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच त्यांचा पक्ष पीटीआयवरही निवडणुकीपूर्वी बंदी घालण्यात आली. मात्र, इम्रान खान यांच्या समर्थक नेत्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पीटीआय समर्थित 100 अपक्ष उमेदवार विजयी झाले. तर नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनला 73 जागांवर विजय मिळाला.