नवाज शरीफ यांची सरकार स्थापनेची घोषणा; आता अपक्ष उमेदवारांच्या हातात पाकिस्तानचे भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 10:17 PM2024-02-09T22:17:22+5:302024-02-09T22:20:22+5:30
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे.
Pakistan Election: गेल्या दोन दिवसांपासून शेजारील देश पाकिस्तानमध्ये निवडणुकीची धूम सुरू आहे. काल रात्र आणि आज दिवसभरापासून सुरू असलेली मतमोजणी अंतिम टप्प्यात असून इम्रान खान यांच्या पक्षासोबतच नवाझ शरीफ यांनीही आपल्या पक्षाच्या विजयाचे मोठे दावे केले आहेत. दरम्यान, माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांनी सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष 'सिंगल लार्जेस्ट पार्टी' म्हणून उदयास आल्याचे म्हटले आहे.
मतमोजणीदरम्यान माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या या घोषणेनंतर पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. इम्रान खान यांच्या पक्षावर निवडणूक आयोगाने बंदी घातल्यामुळे बहुतांश उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यामुळे आता पाकिस्तानचे भविष्य अपक्षांच्या हाती असणार आहे.
اللہ کے فضل و کرم سے ان انتخابات میں پاکستان مسلم لیگ ن سب سے بڑی جماعت بن کے ابھری ہے۔ میں سمجھتا ہوں کہ ہمارا فرض ہے کہ اس ملک کو بھنور سے نکالا جائے ،اللہ کے فضل سے ہم نے پہلے بھی ملک کو مشکلات سے نکالا ہے۔
— PMLN (@pmln_org) February 9, 2024
قائد مسلم لیگ (ن) محمد نوازشریف#EkVariFerSher#قوم_کا_فیصلہ_نوازpic.twitter.com/rb306dStTo
अपक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न
नवाझ शरीफ यांनी शुक्रवारी लाहोरमध्ये समर्थकांना संबोधित करताना म्हटले की, आम्ही सर्व पक्ष जनादेशाचा आदर करतो. देशाला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी पीएमएल-एनची आहे. देशात नवीन सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू आहेत. मी अपक्ष आणि इतर पक्षातील नेत्यांना विनंती करतो की, देशाला पुढे नेण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्हाला कोणाशीही लढायचे नाही, पाकिस्तान सध्या कोणाशीही लढण्याच्या स्थितीत नाही. आम्ही आमचे शेजारी आणि जगातील इतर देशांशी संबंध सुधारू, असंही ते यावेळी म्हणाले.
शेहबाज शरीफ यांच्यावर जबाबदारी
ते पुढे म्हणाले की, आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांशी चर्चा करत आहोत. मी शेहबाज शरीफ यांना आसिफ झरदारी, मौलाना फजल उर रहमान आणि एमक्यूएम नेत्यांना सरकार स्थापन करण्यासाठी भेटण्यास सांगितले आहे. पाकिस्तानला किमान 10 वर्षे स्थिरतेची गरज आहे. जे लोक संघर्षाच्या मनस्थितीत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्हाला कोणतेही युद्ध नको आहे. पाकिस्तान हे सहन करू शकत नाही. आपण सर्वांनी एकत्र बसून प्रश्न सोडवले पाहिजेत आणि पाकिस्तानला 21 व्या शतकात नेले पाहिजे. ही फक्त माझी किंवा इशाक दार यांची जबाबदारी नाही. हा सगळ्यांचा पाकिस्तान आहे. आपण सर्वांनी एकत्र काम केले तरच पाकिस्तान या संकटातून बाहेर पडू शकेल.