पाकिस्तानात इम्रान खान तुरुंगात, तरी त्यांचे उमेदवार पुढे; निकालाला सुरुवात, कोणाचे सरकार येतेय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 05:42 PM2024-02-09T17:42:17+5:302024-02-09T17:44:32+5:30
Pakistan Election Result: सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. एकही दिवस प्रचाराला येऊ दिले नाही.
पाकिस्तानमध्ये गुरुवारी राष्ट्रीय निवडणूक पार पडली. पाकिस्तानच्या संसदेत एकूण ३३६ जागा आहेत. यापैकी २६५ जागांवर निवडणूक झाली. सरकार बनविण्यासाठी १३३ जागांची गरज आहे. सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी क्रिकेटर आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात टाकण्यात आले आहे. असे असले तरी त्यांनी आपली जादू दाखविण्यास सुरुवात केली आहे.
पाकिस्तानात मुस्लिम लीग-नवाज (PML-N), पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (PTI) आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) या तीन पक्षांत खरी लढत आहे. निकालाला सुरुवात झाली असून इम्रान खान यांचा पक्ष आघाडीवर आहे.
पाकिस्तानी निवडणूक आयोगाने सुमारे १८ तास उशिराने मतमोजणीला सुरुवात केली आहे. अफरातफर करण्यासाठी निवडणुकीचा निकाल लावण्यास उशिर करण्यात आल्याचा आरोप इम्रान यांच्या पीटीआयने केला आहे.
दरम्यान, पाकिस्तानी आयोगाने १४६ जागांवर निकाल घोषित केले असून इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पीटीआयचे ६० समर्थक जिंकले आहेत. तर नवाझ शरीफ यांचा पक्ष मुस्लिम लीगला ४३ जागा जिंकता आल्या आहेत. तर भुट्टो यांचा पक्ष पीपीपीला ३७ जागा जिंकता आल्या आहेत. ६ जागांवर अन्य उमेदवार जिंकले आहेत.
पाकिस्तानातील निवडणुकीच्या या निकालाचा धसका तेथील शेअर बाजाराने घेतला असून २००० अंकांनी शेअर बाजार कोसळला आहे. काही पीटीआय समर्थक उमेदवारांचा विजय होऊनही निकाल जाहीर करण्यात आलेला नाहीय. यामुळे पीटीआय समर्थक रस्त्यावर आले आहेत व त्यांनी मरियम के पापा चोर है ची घोषणाबाजी सुरु केली आहे.