No means No! पाकिस्तानचा निर्णय; दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाचा निवडणुकीत पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 15:56 IST2024-02-09T15:56:29+5:302024-02-09T15:56:58+5:30
हाफिजचा मुलगा तल्हा सईद निवडणुकीत थेट सहाव्या क्रमांकावर

No means No! पाकिस्तानचा निर्णय; दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाचा निवडणुकीत पराभव
Hafeez Saeed Son Lost in Pakistan Elections: पाकिस्तानात गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले असून त्यात दहशतवादाला नाकारल्याचा निर्णय पाकिस्तानी जनतेने दिला आहे. संपूर्ण निवडणूक ही पीटीआय पुरस्कृत अपक्ष उमेदवार आणि नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाचे उमेदवार यांच्यात झाली. दहशतवादी हाफिज सईद याचा मुलगा यावेळी निवडणुकीसाठी उभा राहिला होता. त्यामुळे भारतीयांनाही या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता होती. अखेर तो निकाल आला असून त्यात हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईद हा लाहोरमधून पराभूत झाला आहे.
हाफिद सईदचा पक्ष पाकिस्तानी मरकझी मुस्लिम लीगने अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यापैकी एका जागेवर हाफिज सईदचा मुलगा तल्हा सईदही उमेदवार होता. मिळालेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत तल्हा सईदचा दारूण पराभव झाला आहे. सईद लाहोरच्या NA-122 जागेवरून उमेदवार होता पण पाकिस्तानच्या मतदारांनी दहशतवादाला नकार दिल्याचे दिसून आले. निकालात तल्हा सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. त्याला केवळ २ हजार ०४२ मते मिळाली.
कोणी केला पराभव?
तल्हाचा पराभव करणाऱ्या नेत्याचे नाव लतीफ खोसा असून ते पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे निकटवर्तीय मानले जातात. लाहोरच्या या जागेवरून लतीफ खोसा यांनी १ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. पाकिस्तानच्या निवडणुकीत त्यांनी लाहोरच्या त्या जागेवरून उमेदवारी दाखल केली होती, जिथून पीटीआय नेते आणि माजी पंतप्रधान इम्रान खान निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, नंतर अटक आणि एकापाठोपाठ तीन खटल्यांमध्ये शिक्षा झाल्यामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाही.
कोण आहे तल्हा सईद?
तल्हा सईद हा लष्कर-ए-तैयबाचा नंबर दोनचा दहशतवादी मानला जातो. हाफिज सईदनंतर त्याचे संपूर्ण दहशतवादी साम्राज्य तल्हा सईदकडे आहे. भारत सरकारने तल्हाला UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे. भारतातील लष्कर-ए-तैयबाच्या हल्ल्यामागे तल्हा सईदचा हात होता, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. लष्कर-ए-तैयबासाठी भरती आणि निधी उभारणीतही तल्हाचे नाव पुढे आले आहे. तसेच, तो भारताविरुद्ध हल्ल्याचा कट रचत असल्याचे समजते. तल्हा वर अनेकवेळा हल्ले झाले मात्र तो त्यातून वाचला आणि फरार झाला.