ऐसी धाकड है... पाकमधील निवडणुकीत हिंदू महिलेचं मुस्लिम उमेदवारांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 12:01 PM2018-07-07T12:01:22+5:302018-07-07T12:02:26+5:30
25 जुलै रोजी पाकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हिंदू महिला मुस्लिम उमेदवारांना आव्हान देत आपलं नशीब आजमावणार आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांतात पहिल्यांदाच मुस्लिम उमेदवारांना टक्कर देण्यासाठी हिंदू महिला रिंगणात उतरली आहे. 25 जुलै रोजी पाकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हिंदू महिला मुस्लिम उमेदवारांना आव्हान देत आपलं नशीब आजमावणार आहे. सुनीता परमार असं या 31 वर्षीय हिंदू महिलेचं नाव असून त्या मेघवार समुदयाच्या आहे. सुनीता या अल्पसंख्याक समुदयाच्या असून निवडणूक लढवत असल्याने पाकिस्तानात त्यांनी इतिहास रचला आहे.
थारपरकर जिल्ह्यामधील सिंध विधानसभा मतदारसंघातील पीएस 56 साठी सुनीता यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाकिस्तानातील सर्वात जास्त हिंदू हे याच विधानसभा मतदार संघात राहतात. आधीच्या सरकारने लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तसेच त्यांचं जीवनमान उंचावण्यातही ते असफल ठरले. त्यामुळेच येथील परिस्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुनीता यांनी सांगितलं. एकविसाव्या शतकातही महिलांसाठी पायाभूत सोयीसुविधा आणि चांगल्या शैक्षणिक संस्थांचा अभाव आहे. महिलांना पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते. तसेच विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच लोकांच्या गरजा पूर्ण करणं आणि समस्या सोडवणं हा हेतू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
2013 च्या निवडणुकीत नवाज शरीफ यांच्या पक्षाला बहूमत मिळाले होते. मात्र भ्रष्टाचार प्रकरणात शरीफ यांना शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे यावेळी त्याच्या पक्षासाठी ही एक समस्या निर्माण झाली आहे. महिलांसाठी पाकिस्तान हे नेहमीच असुरक्षित मानलं जातं. विशेषत: हिंदू महिलांना पाकमध्ये जगणं मुश्किल आहे. अनेकदा त्यांचं अपहरण करून जबरदस्तीने त्यांना धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडलं जातं किंवा विवाह केला जातो. त्यामुळेच एकंदरीत अशा भीषण परिस्थितीत सुनीता यांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच प्रशंसनीय आहे.