होय, मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच होते; नवाज शरीफ यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 05:06 PM2018-05-12T17:06:15+5:302018-05-12T17:06:15+5:30
पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचं शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केलं
इस्लामाबाद: मुंबईवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही, असा दावा कायम पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर केला जातो. मात्र शरीफ यांच्या कबुलीनं पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचं शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केलं. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन 9 महिन्यांपूर्वी शरीफ पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले आहेत.
पाकिस्तानी न्यायालयात मुंबई हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी अतिशय संथगतीनं सुरू आहे. त्यावरही शरीफ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'जेव्हा देशात दोन किंवा तीन समांतर सरकारं चालवली जात असतात, तेव्हा देशाचा गाडा हाकणं कठीण असतं. हे थांबायला हवं. देशात फक्त एकच सरकार असू शकतं, जे संविधानाच्या चौकटीत चालवलं जातं,' असं म्हणत शरीफ यांनी पाकिस्तान सरकारमधील हस्तक्षेपावर भाष्य केलं.
कोणत्या कारणामुळे तुमचं पंतप्रधानपद गेलं, असा प्रश्न या मुलाखतीत नवाज शरीफ यांना विचारण्यात आला. मात्र त्यांनी या प्रश्नाचं थेट उत्तर देणं टाळलं. या प्रश्नाला उत्तर देताना शरीफ यांनी परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. 'आम्ही स्वत:ला वेगळं करुन घेतलं होतं. अनेकदा बलिदानं देऊनही कोणालाही आमचं म्हणणं पटत नव्हतं. अफगाणिस्तानची व्यथा सगळ्यांनी ऐकली. ती सर्वांना पटली. मात्र आमचं म्हणणं कोणीही मान्य केलं नाही. याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं,' असं शरीफ म्हणाले.
यावेळी नवाज शरीफ यांनी दहशतवादी संघटनांवरही भाष्य केलं. 'दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. त्यांना सीमा ओलांडायची आणि मुंबईत जाऊन 150 लोकांची हत्या करण्याची परवानगी द्यायला हवी का?,' असं शरीफ यांनी म्हटलं. 'रावळपिंडीच्या दहशतवादविरोधी न्यायालयात आम्ही मुंबई हल्ल्याची सुनावणी का पूर्ण केली नाही ?,' असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला. याआधी पाकिस्ताननं नेहमीच 2008 मधील मुंबई हल्ल्यात आपला कोणताही हात नसल्याचा दावा केला आहे.