इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, सायफर प्रकरणात दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 04:43 PM2023-10-23T16:43:39+5:302023-10-23T16:44:02+5:30
हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित आहे, जे इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. गोपनीय डिप्लोमॅटिक केबल्स (सायफर) लीक करणे आणि गुप्तता कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विशेष न्यायालयाने सोमवारी इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना दोषी ठरवले. हे प्रकरण एका डिप्लोमॅटिक दस्तऐवजाशी संबंधित आहे, जे इम्रान खान यांच्याकडून कथितपणे गायब झाले होते.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) आरोप केला आहे की, दस्तऐवजात अमेरिकेने इम्रान खान यांना पदावरून हटवण्याची धमकी दिली होती. इम्रान खान यांना ५ ऑगस्टला तोशाखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने २९ ऑगस्टला त्यांची शिक्षा स्थगित केली होती, परंतु सायफर प्रकरणात न्यायालयीन कोठडी असल्यामुळे ते तुरुंगातच होते. यादरम्यान, ३० सप्टेंबर रोजी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये कुरेशी यांचे सायफर प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.
पीटीआयच्या दोन्ही नेत्यांना १७ ऑक्टोबरला दोषी ठरवण्यात येईल, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. मात्र, गेल्या आठवड्यात न्यायालयाने सुनावणी २३ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात सोमवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अबुअल हसनत जुलकरनैन यांनी सुनावणी घेतली. न्यायालयाने या प्रकरणाची औपचारिक सुनावणी सुरू केली आणि २७ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणीसाठी साक्षीदारांना बोलावले.
एफआयएचे विशेष वकील शाह खवर म्हणाले की, आजची सुनावणी आरोपासाठी होती. खुल्या न्यायालयात दोषारोपाचे वाचन करण्यात आले. आरोप जाहीर करताना पीटीआयचे दोन्ही नेते उपस्थित होते आणि पुढील कार्यवाही २७ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्या दिवशी साक्षीदारांना हजर केले जाणार आहे. दरम्यान, इम्रान खान यांचे वकील उमैर नियाझी यांनी सांगितले की, इम्रान खान यांनी गुन्हा नाकारला आहे. न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे.