४ वर्षानंतर मायदेशी परतले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ; म्हणाले, "परिस्थिती खूपच बिघडलीय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 04:32 PM2023-10-21T16:32:47+5:302023-10-21T16:34:46+5:30
नवाझ शरीफ हे विशेष विमान 'उमीद-ए-पाकिस्तान' ने दुबईहून इस्लामाबादला पोहोचले.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आपल्या पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी आणि जानेवारीमध्ये पाकिस्तानमध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी चौथ्यांदा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ब्रिटनमध्ये चार वर्षांच्या आत्म-निर्वासितानंतर शनिवारी दुबईहून विशेष विमानाने नवाझ शरीफ पाकिस्तानात परतले आहेत.
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे (PML-N) प्रमुख नवाझ शरीफ हे विशेष विमान 'उमीद-ए-पाकिस्तान' ने दुबईहून इस्लामाबादला पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मित्रमंडळीही होती. तत्पूर्वी, दुबई विमानतळावर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानमधील सद्यस्थितीबद्दल पत्रकारांसमोर चिंता व्यक्त केली.
देशातील परिस्थिती २०१७ च्या तुलनेत खूपच बिघडल्याचे नवाझ शरीफ यांचे म्हणणे आहे. तसेच, विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी नवाझ शरीफ यांनी दुबई विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, आम्ही देशाच्या समस्या सोडविण्यास सक्षम आहोत. नवाझ शरीफ म्हणाले, "परिस्थिती २०१७ पेक्षा चांगली नाही... आणि हे सर्व पाहून मला वाईट वाटते की, आपला देश पुढे जाण्याऐवजी मागे गेला आहे."
जिओ न्यूजने नवाज शरीफ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "पाकिस्तानमधील परिस्थिती खूप वाईट आहे आणि ती खूप चिंताजनक आहे". दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले होते आणि नंतर भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये त्यांना जबाबदार धरत दोषी घोषित करण्यात आले होते.