पाकिस्तान तोंडघशी!
By admin | Published: September 23, 2016 06:34 AM2016-09-23T06:34:07+5:302016-09-23T06:34:07+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काश्मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रात पूर्णत: तोंडघशी पडले असून, काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याची नवाझ शरीफ यांची मागणी संयुक्त राष्ट्राचे महासचिव
संयुक्त राष्ट्रे : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काश्मीरच्या मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रात पूर्णत: तोंडघशी पडले असून, काश्मीर प्रश्नी हस्तक्षेप करण्याची नवाझ शरीफ यांची मागणी संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी थेट फेटाळूनच लावली आहे. पाकिस्तानसाठी हा मोठाच झटका आहे.
नवाझ शरीफ यांनी काश्मीरमध्ये भारत सरकारतर्फे मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप केल्यानंतर भारतानेही संयुक्त राष्ट्रामध्येच त्यांना सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तान हा दहशतवादी देश असून, दहशतवादाला पुरस्कृत करण्याचे पाकिस्तानचे जे जुने धोरण आहे त्यातून पाकिस्तान भारताविरोधात युद्धसदृश गुन्हे करीत आला आहे, असे भारताने म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्राने ज्यांना दहशतवादी घोषित केले आहे असे दहशतवादी पाकिस्तानच्या रस्त्यांवर राज्यकर्त्यांच्या पाठिंब्याने उघडपणे फिरत आहेत आणि त्यांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान मदत करीत आहे, असे भारताने म्हटले आहे. मानवी हक्काचे सर्वांत वाईट उल्लंघन कुठले असेल तर तो दहशतवाद आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायम सचिव इनाम गंभीर म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीच्या स्वरुपात मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सचा उपयोग पाकिस्तानकडून तेथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी केला जात असल्यामुळेच पाकिस्तानला आम्ही दहशतवादी देश मानतो, असे भारताने स्पष्ट केले.
हस्तक्षेपाची मागणी फेटाळून लावताना, भारत आणि पाकिस्तानने परस्परांशी चर्चा करुन काश्मीरसह अन्य वादांवर तोडगा शोधावा, असा सल्ला बान की मून यांनी नवाझ शरीफ यांना दिला.
बान की मून यांनी हस्तक्षेपाची मागणी फेटाळल्यानंतरही शरीफ यांनी मून यांच्या वक्तव्यांचे स्वागत केले. काश्मीरमधून भारतीय सैन्य हटवण्याची गरज आहे, असे
सांगून भारताने चचेर्साठी अनावश्यक अटी ठेवल्याची तक्रार त्यांनी
केली.
काश्मीरचा मुद्दा सोडवला जात नाही तोपर्यंत भारत आणि पाकिस्तानात शांतता नांदणार नाही, असाच जुनाच सूर त्यांनी आळवला.
विमानसेवा खंडित?
भारतीय लष्कराच्या विशेष जवानांनी बुधवारी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून २0 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले आणि त्या वेळी अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त एका वेबसाइटने दिले होते. केंद्र सरकारकडून वा लष्कराच्या कोणत्याही सूत्रांकडून त्याला दुजोरा मिळाला नाही. मात्र या वृत्तानंतर पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाइन्सनं उत्तर पाकिस्तानमधल्या शहरांतील विमानसेवा रद्द केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधली गिलगिट आणि स्कर्डूची सेवा खंडित केल्याची माहिती त्या वेबसाइटने दिली आहे.