पाकिस्तानने अखेर राफेलसोबत युद्धसराव केलाच; भारताकडे तेच एक सर्वात शक्तीशाली लढाऊ विमान...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 13:01 IST2025-02-16T13:00:42+5:302025-02-16T13:01:10+5:30
भारतीय हवाई दल हलक्या श्रेणीतील लढाऊ विमान तेजस एमके१ ए च्या नव्या पिढीची वाट पाहत आहे.

पाकिस्तानने अखेर राफेलसोबत युद्धसराव केलाच; भारताकडे तेच एक सर्वात शक्तीशाली लढाऊ विमान...
भारताकडे सध्या असलेल्या सर्वात शक्तीशाली फायटर जेट राफेलसोबत पाकिस्तानने युद्ध सराव केल्याने खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे ज्या देशाकडून भारताने ही लढाऊ विमाने खरेदी केली त्याच देशाने युद्ध सरावात भाग घेतला होता. यामुळे आधीच लढाऊ विमानांच्या तुटवड्यामुळे चिंतेत असलेल्या हवाई दलाच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवाई दल हलक्या श्रेणीतील लढाऊ विमान तेजस एमके१ ए च्या नव्या पिढीची वाट पाहत आहे. अमेरिकेने या विमानाची इंजिने अद्याप पुरविलेली नाहीत. अशातच हिंदुस्तान एअरोनॉटिक्सकडून देखील या विमानांच्या बांधणीला विलंब होत आहे. यावर हवाई दल प्रमुखांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान चीनच्या पाचव्या पिढीचे स्टिल्थ फायटर विमाने खरेदी करणार असल्याचे वृत्त आले होते.
चीन आणि पाकिस्तानने मिळून जेफ-१७ ब्लॉक ३ हे लढाऊ विमान बनविले आहे. या लढाऊ विमानाला घेऊन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय युद्धाभ्यासात भाग घेतला होता. या युद्धाभ्यासात राफेल, एफ १५ ईगल आणि युरोफायटर टायपून ही लढाऊ विमाने सहभागी झाली होती. पाकिस्तानला राफेलसोबत युद्धसराव करण्यास मिळाल्याने राफेलच्या शक्ती आणि त्याच्या कमतरता यासोबतच राफेलविरोधात कसे लढावे, याची माहिती मिळणार आहे. जे भारतासाठी घातक ठरू शकते.
सौदी अरेबियात हा युद्धसराव आयोजित करण्यात आला होता. व्हिक्ट्री स्पिअर २०२५ असे याचे नाव होते. सौदीने आपल्याकडील एफ-15, EF-2000 आणि टॉर्नेडो लढाऊ विमाने उरविली होती. बहारीनने एफ १६, फ्रांसने राफेल आणइ कतरने ईएफ २००० लढाऊ विमान आणले होते.
पाकिस्तानने या युद्धसरावाची माहिती दिली आहे. JF-17 ब्लॉक III हे अत्याधुनिक रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध उपप्रणालींनी सुसज्ज आहे. लांब पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या PL-15E क्षेपणास्त्राचा वापर यात करता येतो. हे विमान १४५ किमीपर्यंत मारा करू शकते. तसेच हे लढाऊ विमान क्रूझ क्षेपणास्त्र तैमूर तैनात करण्यास सक्षम आहे. हे लढाऊ विमान भारताच्या तेजसच्या तोडीचे असल्याचे सांगितले जाते.