कोरोना काळात मच्छीमाराचे नशीब फळफळले; दुर्मिळ माशाने मालामाल बनवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 02:40 PM2021-05-31T14:40:23+5:302021-05-31T14:41:07+5:30
pakistan fishermen won heart: लिलावात या माशाची बोली 86 लाखांवर गेली होती. परंतू आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमी सूट देतो. यामुळे परंपरेचे पालन करून आम्ही या ग्राहकाला हा मासा 72 लाखांना दिला आहे.
कराची : माणसाचे नशीब कधी पलटेल सांगता येत नाही, जडजवाहिरांशी खेळणारा अब्जाधीश कधी कंगाल होईल आणि गरिबीशी झुंजणारा कधी मालामाल होऊ, देव जाणे. असाच एक प्रकार पाकिस्तानच्या मच्छीमारासोबत (fishermen ) झाला आहे. पाकिस्तानच्या ग्वादर भागातील एका मच्छीमाराला अरबी समुद्रात एक दुर्मिळ मासा मिळाला. या माशाचे वजन 48 किलो असून बाजारात याची किंमत 72 लाख रुपये आहे. हा मासा क्रोआकेर प्रजातीचा आहे. (pakistan fishermen catches fish worth rs 86 lakhs)
लाखो रुपयांचा हा मासा पकडणाऱ्या नौकेचा मालक हाजी अबाबकर याने डॉन वृत्तपत्राला सांगितले की, आम्हाला हा मासा सापडला तेव्हा ग्वादरच्या मत्स्य पालन विभागाचे उप संचालक अहमद नदीम यांना सांगितले. त्यांनी या माशाच्या प्रकाराची माहिती देऊन एवढा महाग मासा या आधी कधी पाहिला नसल्याचे ते म्हणाले.
या माशाची विक्री 72 लाखांना झाली आहे. अबाबकर याने सांगितले की, लिलावात या माशाची बोली 86 लाखांवर गेली होती. परंतू आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमी सूट देतो. यामुळे परंपरेचे पालन करून आम्ही या ग्राहकाला हा मासा 72 लाखांना दिला आहे. पाकिस्तानचे समुद्री जीवशास्त्रज्ञ अब्दुल रहीम बलोच यांनी सांगितले की, या क्रोआकेर प्रजातीच्या माशांची चीन आणि युरोपमध्ये मोठी मागणी आहे.
या माशाचा वापर औषधे आणि सर्जरीसाठी केला जातो. काही महिन्यांपूर्वी अब्दुल हक नावाच्या मच्छीमाराला हा मासा मिळाला होता. हा मासा 7 लाख 80 हजार पाकिस्तानी रुपयांना विकला गेला होता.