Pakistan Flood : भीषण! पाकिस्तानमध्ये पावसाचे थैमान, 1300 जणांचा मृत्यू; कोट्यवधी लोकांना बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 01:04 PM2022-09-04T13:04:20+5:302022-09-04T13:12:50+5:30
Pakistan Flood : पाकिस्तानातील महापुरामुळे देशातील जवळपास 1,300 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लष्कराचे मदतकार्य सुरू आहे.
पाकिस्तानमध्ये मुसळधार पुराचा कहर सुरूच आहे. या पुरात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पाकिस्तान सरकारने जगभरातील देशांना मदतीचे आवाहन केले आहे. दरम्यान, पाकिस्तानातील महापुरामुळे देशातील जवळपास 1,300 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागात लष्कराचे मदतकार्य सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) शनिवारी सांगितले की, पाकिस्तानमध्ये गेल्या 24 तासांत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. जूनपासून देशातील मृतांची संख्या 1,290 वर पोहोचली आहे.
पाकिस्तानच्या सरकारी संस्था आणि खासगी स्वयंसेवी संस्था देखील पूरग्रस्त भागात मदतीचा हात पुढे करत आहेत. देशाचा मोठा भाग पाण्याखाली आहे, विशेषत: दक्षिणेकडील बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि सिंध प्रांतांत कहर पाहायला मिळत आहे. जिओ न्यूजच्या अहवालानुसार, सिंधमध्ये किमान 180 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर खैबर पख्तूनख्वा (138) आणि बलुचिस्तान (125) आहेत. याशिवाय या पुरात किमान 1,468,019 घरांचे अंशत: किंवा पूर्ण नुकसान झाले आहे.
पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार
पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोट्यवधी लोकांनी पुराचा फटका बसला असून आतापर्यंत एक हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून मोठं नुकसान झालं आहे. पाकिस्तानमधील अनेक भागांत आलेल्या पुराचा तब्बल 3 कोटी नागरिकांना फटका बसला. पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन दलाने याआधी दिलेल्या माहितीनुसार, तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक रस्ते, 150 पूल आणि तब्बल सात लाख घरं वाहून गेली आहेत.
पुरामुळे निम्म्याहून अधिक देश पाण्याखाली
पाकिस्तानमधील हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुरामुळे सध्या निम्म्याहून अधिक देश पाण्याखाली आहे. मोसमी मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुरात लाखो नागरिक बेघर झाले. 57 लाख नागरिक बेघर झाले आहेत. पुराचा सर्वाधिक तडाखा खैबर-पख्तूनख्वा, बलूचिस्तान आणि सिंध या प्रांतांना बसला आहे. पुरात रस्ते आणि पुल वाहून गेले असल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले असून मोठय़ा प्रमाणात प्राण्यांचा बळी गेला आहे. पुराची भीषणता दाखवणारे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.