महागाईचा आगडोंब! पाकिस्तानमध्ये पिठासाठी तुफान राडा; एक पॅकेट 3100 रुपये, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 12:09 PM2023-01-08T12:09:31+5:302023-01-08T12:11:38+5:30
सिंध प्रांतात अनुदानित पिठाचे पाकीट मिळविण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.
पाकिस्तानमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिठासाठी पाकिस्तानात तुफान राडा होत आहे. देशात पिठाच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. लोकांना बाजारातून पीठ घेणं अत्यंत अवघड झाले आहे. संपूर्ण पाकिस्तानातील बाजारातून अनुदानित पिठाचा साठा संपला आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांना अनुदानित पीठ कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठी आता सरकारला पुढाकार घ्यावा लागला आहे.
रविवारी, पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये, सरकारी अनुदानित पिठाची पाकिटे सर्वसामान्य नागरिकांना बाजारापेक्षा कमी किमतीत वितरित करण्यात आली. हे मिळवण्यासाठीही लोकांची गर्दी झाली होती आणि अनुदानित पिठाची पाकिटे घेण्यासाठी जमलेल्या गर्दीमुळे दुर्घटना झाल्या असून त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.
पिठाच्या वाढलेल्या किमतींमुळे पाकिस्तानमध्ये कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे तीन घटनांवरून समजू शकते. सिंध प्रांतात अनुदानित पिठाचे पाकीट मिळविण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. काही लोक वाहनावर पिठाची पाकिटे घेऊन सिंधमधील मीरपूर खास येथे पोहोचले. कमी किमतीत पिठाची पाकिटे मिळविण्याच्या प्रयत्नात मोठ्या संख्येने लोक जमले.
लोक वाहनाच्या मागे धावताना दिसले. कमी किमतीत पिठाचे पाकीट मिळावे यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील होता. वाहनावरील पिठाची पाकिटे मर्यादित होती. परिस्थिती चेंगराचेंगरीत बदलली आणि एक व्यक्ती खाली पडून जखमी झाला, त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताचे वय 45 वर्षे असून त्याला सहा मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. कमी किमतीत आपल्या कुटुंबासाठी पीठ मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता.
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात बाजारात अनुदानित पिठाचा साठा संपल्याची माहिती मिळत आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये, लोक पिठासाठी सरकारी दुकाने शोधताना दिसले जेथे 1200 रुपयांना पिठाचे पॅकेट मिळते. खुल्या बाजारात 20 किलोच्या पिठाच्या पाकिटाची किंमत 3100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
सरकारने पिठाच्या पाकिटाची किंमत 1200 रुपये ठरवून दिलेली असताना ही परिस्थिती आहे. बलुचिस्तानमध्येही अशीच परिस्थिती आहे. अनुदानित पिठाची पाकिटे मिळविण्यासाठी लोक भांडताना दिसले. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवणे पाकिस्तान सरकारला अवघड वाटते. मैद्याबरोबरच इतर वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"