जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 04:35 PM2019-09-10T16:35:50+5:302019-09-10T17:00:29+5:30
गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे.
जिनिव्हा - गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या आक्रमक निर्णयामुळे पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. दरम्यान, आज पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर काश्मीर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काश्मीरचा उल्लेख इंडियन स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर असा केला. त्यामुळे पाकिस्तानने अप्रत्यक्षपणे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे कबुल केल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH: Pakistan Foreign Minister Shah Mehmood Qureshi mentions Kashmir as “Indian State of Jammu and Kashmir” in Geneva pic.twitter.com/kCc3VDzVuN
— ANI (@ANI) September 10, 2019
दरम्यान, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेसमोर (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी काश्मीरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप केला. यूएनएचआरसीने काश्मीरमधील मानवाधिकारांच्या हननाकडे लक्ष द्यावे, असे सांगत त्यांनी याप्रकरणी संयुक्त तपास समिती स्थापन करण्याची मागणी केली.
यूएनएचआरसीने काश्मीरच्या मुद्द्यावरून मौन बाळगू नये. भारताने काश्मिरींना दिलेला विशेष दर्जा संपुष्टात आणला आहे. काश्मीर हे मानवाधिकारांची दफनभूमी बनली आहे, असा आरोपही पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी केला.