Article 370 : भारताचा अंतर्गत मुद्दा म्हणत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना आधी उपरती; विरोधानंतर आता युटर्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 07:15 PM2021-05-10T19:15:22+5:302021-05-10T19:18:08+5:30
Pakistan On Article 370 : कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणाले होते शाह महमूद कुरैशी. विरोधी पक्षांकडून झालेल्या विरोधानंतर घेतला युटर्न
जम्मू काश्मीरवरून सतत गरळ ओकणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी आपल्याच एका वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुरैशी यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्यानंतर विरोधकांनी त्यांना घेरण्यास सुरूवात केली. परंतु आता कुरैशी यांना आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
"मी स्पष्ट करू इच्छितो की जम्मू काश्मीर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अजेंड्यात आंतरराष्ट्रीय वादग्रस्त मुद्दा मानला गेला आहे. यावर तोडगा तेव्हाच निघू शकेल जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली जनमत चाचणी घेतली जाईल. जम्मू काश्मीरशी निगडीत कोणताही मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा असूच शकत नाही," असं म्हणत कुरैशी यांनी टीकेनंतर सारवासारव केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर भाष्य केलं.
After two years, foreign minister Qureshi has realised article 370 means nothing to Pakistan. "It is India's internal issue." pic.twitter.com/FFp2i7l7VT
— Naila Inayat (@nailainayat) May 7, 2021
काय म्हणाले होते कुरैशी?
सोशल मीडियावर कुरैशी यांनी जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात आपल्याला कलम ३७० हटवल्यानं कोणतीही अडचण नाही असं म्हणताना दिसत आहेत. "कलम ३७० पाकिस्तानसाठी महत्त्वाचं नाही. तो भारताचा अंतर्गत विषय आहे. पाकिस्तानला ३५ ए कलम हटवण्यावर आक्षेप आहे. यामुळे भारत आपल्या भौगोलिक रचनेत बदल करू शकेल," असं कुरैशी म्हणाले होते.
Let me be clear: Jammu & Kashmir is an internationally recognised dispute on the @UN Security Council agenda. Final settlement of the dispute lies in #UNSC resolution calling for free and impartial plebiscite under UN auspices. Nothing about J&K can be India’s internal matter.
— Shah Mahmood Qureshi (@SMQureshiPTI) May 10, 2021
पाकिस्तानातून विरोध
कुरैशी यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोत उठवली होती. "कुरैशी यांचं वक्तव्य काश्मीरबाबत पाकिस्तानची ऐतिहासिक भूमिकेवरून युटर्न घेण्यासारखं आहे," असं वक्तव्य पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे प्रवक्ते मोहम्मद झुबेर यांनी केलं. पाकिस्तान काश्मीरला कायमच वादग्रस्त क्षेत्र मानत आला आहे. परंतु कुरैशी यांच्या वक्तव्यावरून पाकिस्ताननं युटर्न मारल्याचं वाटत असल्याचे ते म्हणाले.